पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांचा लाठीहल्ला, प्रचंड धुमश्चक्री… आंदोलक वृद्धेचा हृदयविकाराने मृत्यू
पुरंदरमधील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाविरोधात सात गावांतील शेतकरी एकवटले असून, त्यांनी भूसंपादनाला कडाडून विरोध केला. हा विरोध मोडून काढण्यासाठी आज पोलिसांनी बळाचा वापर करत कुंभारवळण येथे अश्रूधुराच्या नळकांडय़ा पह्डून शेतकऱयांवर बेफाम लाठीमार केला. यात अनेकजण जखमी झाले. संतप्त शेतकऱयांनी केलेल्या दगडफेकीत 30 पोलीस कर्मचारी आणि 4 अधिकारी जखमी झाले. पोलिसांनी केलेल्या हल्ल्याने घाबरलेल्या एका ज्येष्ठ महिलेचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला असून परिसरात प्रचंड तणाव आहे.
पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, एखतपूर, मुंजवडी, कुंभारवळण, खानवडी आणि पारगाव या सात गावांमधून 2 हजार 673 हेक्टर इतके भूसंपादन करण्यात येणार आहे. याविरोधात सात गावांतील शेतकऱयांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकऱयांच्या भावनांचा विचार न करता शासकीय यंत्रणेने भूसंपादनाची प्रक्रिया सुरूच ठेवली आहे. शुक्रवारी शेतकऱयांनी भूसंपादनाला विरोध करत ड्रोन पह्डले होते. कालच्या आंदोलनामुळे आज पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला होता.
कुंभारवळण येथे आज जमीन मोजणीसाठी आलेल्या पथकाला गावकऱयांनी रोखले. त्यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलकांनी ‘विमानतळ झाल्यास ते आमच्या प्रेतावरून होईल. आम्ही हा प्रकल्प कदापी होऊ देणार नाही.’ अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यावर पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांडय़ा पह्डत आंदोलकांवर लाठीहल्ला केला. यात अनेक आंदोलक जखमी झाले. संतापलेल्या आंदोलकांनी पोलिसांच्या गाडय़ांवर दगडफेक केली. तसेच शर्यतीच्या बैलगाडय़ा वाहनांपुढे सोडल्या. यात 30 पोलीस कर्मचारी आणि 4 अधिकारी जखमी झाले.
सात गावांत होणाऱया भूसंपादनापैकी एखतपूर या गावातील जमिनींच्या संपादनासाठीचे ड्रोन सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. मात्र, या सर्वेक्षणाला ग्रामस्थांनी विरोध करून काल ड्रोन फोडल्याचे समोर आले आहे. आज जमिनी मोजण्यासाठी आलेल्या पथकाला गावात जाण्यासाठी ग्रामस्थांनी अडवणूक केली. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
ड्रोन सर्वेक्षण आणि जमीन मोजणी थांबवावी, अन्यथा शेतकरी आपले जीवन थांबवतील, असा इशारा ग्रामस्थांनी दिला होता. मात्र, कालपासून ड्रोन सर्वेक्षण सुरु झाल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. याआधी अनेक आंदोलने उपोषणे करूनही प्रशासनाने कोणतीही दाद दिली नाही. आता आमचा जीव गेला तरी चालेल, पण माघार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.
दरम्यान, सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलिसांनी दीपक देशमुख, गणेश कामठे, महेश मोरे, सिद्धार्थ होले, सुरज मेमाणे, सुरेश मेमाणे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच आंदोलनाचे व्हिडिओ बघून कारवाई केली जाईल, असे जिल्हा पोलीस प्रमुख पंकज देशमुख यांनी सांगितले.
आंदोलक वृद्धेचा हृदयविकाराने मृत्यू
पोलिसांनी लाठीहल्ला करताना शेतकऱयांच्या वयाकडेही लक्ष दिले नाही. 87 वर्षीय अंजनाबाई कामठे यांनाही पोलिसांनी धक्काबुक्की केली. पोलिसांच्या धसक्याने अंजनाबाई यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली, असा आरोप आंदोलक शेतकऱयांनी केला. दरम्यान, जिल्हा पोलीस प्रमुख पंकज देशमुख यांनी पत्रकार परिषदेत हा आरोप फेटाळला. अंजनाबाई या आंदोलनात सहभागी नव्हत्या. 15 दिवसांपासून त्या अत्यवस्थ होत्या. त्यातच त्यांचा मृत्यू झाला, असा दावा त्यांनी केला. पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन माहिती घेतली असल्याचेही देशमुख यांनी सांगितले.
कुंभारवळण येथे झालेला प्रकार अतिशय दुर्दैवी आहे. शासनाने नागरिकांच्या भावना समजावून घेऊन योग्य ती पावले उचलणे आवश्यक होते. परंतु, बळाचा वापर करण्यात आला. यात नागरिक जखमी झाले. शासनाने जनतेच्या भावना लक्षात घेऊन संयम आणि संवेदनशीलता दाखविणे आवश्यक होते. आम्ही या घटनेचा निषेध करतो. शासनाने संवेदनशीलपणे हा विषय हाताळावा. सुप्रिया सुळे, खासदार
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List