पिके जमीनदोस्त; शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी, मुसळधार पावसाने पुणे जिल्ह्याला झोडपले

पिके जमीनदोस्त; शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी, मुसळधार पावसाने पुणे जिल्ह्याला झोडपले

वादळी वाऱ्यांसह आलेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील विविध भागांना झोडपून काढले. सासवडमध्ये गारा पडल्या. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. चास येथे शेतांचे बांध फुटले असून, बाजरी, टोमॅटो पिके जमीनदोस्त झाली. काही ठिकाणी काढून ठेवलेला कांदा भिजल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आले आहे. अनेक ठिकाणी ओड्यांना पूर आला. गावांतील रस्त्यांवरून पाण्याचे लोट वाहत होते. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांचे हाल झाले.

आंबेगाव तालुक्यातील कळंब, साकोरे, महाळुंगे पडवळ, चांडोली बुद्रुक, लौकी आदी गावांत सलग दोन दिवस वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस झाला. चास येथे सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे ओढ्या-नाल्यांना पाणी आले आहे. आटकमळा, गणेशवाडी, शेगरमळा, कडेवाडी आणि चास पंचक्रोशीतील शेतांचे बांध वाहून गेले आहेत. चास-घोडेगाव रस्ता चार ठिकाणी खचला आहे. याच रस्त्यावरील चिंचोली आणि चास गावाच्या शिवेवर पुलाचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात पूल तयार करून वाहतूक सुरू करण्यात आली होती; परंतु ओढ्याला आलेल्या पुरात पूल वाहून गेला आहे. मुरूम टाकून तात्पुरता रस्ता सुरू केला आहे.

चास येथील दीपक किसन बारवे यांची साठवणूक केलेला 200 पिशवी कांदा दगडी ओढ्याला आलेल्या पुरात वाहून गेला आहे. शेतांचे बांध फुटले असून, बाजरी, टोमॅटो आदी पिके जमीनदोस्त झाली आहेत.

मेथी, कोथिंबीर व पालेभाज्यांचे पावसाने नुकसान झाले आहे. पावसाच्या तडाख्याने काही भागांतील उन्हाळी बाजरी भुईसपाट झाली आहे. अवसरी, गावडेवाडी, मेंगडेवाडी, लाखनगाव, देवगाव, काठापूर, पारगाव, निरगुडसर या सर्वच गावांत उन्हाळी बाजरीची लागवड करीत असतात. सध्या उन्हाळी बाजरी काढणीला सुरुवात झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी 700 ते 800 रुपये देऊन बाजरीकाढणीला मजूर बोलाविले असून, अनेक शेतकऱ्यांनी शेतातच बाजरी काढून ठेवली आहे. वेळेत मशीन मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. 100 किलो बाजरीच्या एका पोत्याला 3200 इतका बाजारभाव मिळत आहे. या गावांत मोठ्या प्रमाणात कांद्याचे उन्हाळी उत्पादन घेतले जाते. सध्या जोडप्याला दोन वेळचे जेवण यासह 1000 ते 1200 रुपये रोज देऊन कांदाकाढणी अंतिम टप्प्यात आली असून, अनेक शेतकऱ्यांनी शेतातच कांदा ठेवला आहे. परंतु मुसळधार पावसामुळे शेतात काढून ठेवलेला कांदा पूर्णपणे भिजल्याने हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.

पावसाच्या तडाख्याने अनेक गावांतील वीजपुरवठा खंडित झाला होता. रात्री उशिरा तो सुरळीत झाला. शहरातील रस्त्यांवरून पाणी वाहत होते. जागोजागी पाण्याची डबकी साचली आहेत. सुमारे अर्धा तास हा पाऊस पडत होता. पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी आधीच तयारीत होता. अनेक ठिकाणी लग्न समारंभ होते. पावसाने वऱ्हाडी मंडळींची चांगलीच तारांबळ उडाली.

दरम्यान, सातगाव पठार या परिसरात मोठ्या प्रमाणावर दुष्काळसदृश परिस्थिती असताना सोमवारी व मंगळवारी झालेल्या पावसामुळे या ठिकाणी असणाऱ्या वेळ नदीला पाणी आल्यामुळे या परिसरातील नागरिक खूश झाले आहेत.

सासवड व परिसरात आज सकाळी 10 च्या सुमारास वादळी वारे आणि गारांसह सुमारे एक तास तुफान पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसाने नागरिकांची धावपळ उडाली, तर अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या.

शहराचा वीजपुरवठादेखील बराच काळ खंडित होता. पावसाबरोबर वाऱ्याचा वेगदेखील अधिक होता. त्यामुळे सासवड कोर्टनजीकच्या हुतात्मा स्मारकाजवळील बुचाचे झाड एका चारचाकी वाहनावर पडले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. शहरातील जिजामाता उद्यानाजवळ असणाऱ्या भाजी व फळ विक्रेत्यांच्या छताचेदेखील नुकसान झाले.

दरम्यान, सासवड परिसरात तीन दिवस अधूनमधून आभाळ येत होते. पावसाचे वातावरण निर्माण होत होते. उकाडा जाणवत होता. आज सकाळीच अचानक वादळी वारे वाहू लागले व गारांसह पावसाला सुरुवात झाली. यामुळे बाहेर पडलेल्या नागरिकांसह दुकानदारांचीदेखील मोठी धांदल उडाल्याने त्यांना निवारा शोधावा लागला. आज पडलेल्या पावसाची सुमारे 33.7 मि.मी. नोंद सासवड येथील ‘आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान’च्या वेधशाळेत झाल्याची माहिती व्यवस्थापक नितीन यादव यांनी दिली.

नीरा येथे मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता अचानक मान्सूनूर्व पावसाने जोरदार सुरुवात केली. तब्बल सुमारे अर्धा तास जोरदार पाऊस झाल्याने नीरा गावातील रस्त्यांवर पाणी साचले होते. मान्सूनपूर्व पावसामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘अजितदादा, शरद पवार, सुप्रिया सुळे एवढाच त्यांचा पक्ष…’ , राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा, चंद्रकांत पाटलांचा खोचक टोला ‘अजितदादा, शरद पवार, सुप्रिया सुळे एवढाच त्यांचा पक्ष…’ , राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा, चंद्रकांत पाटलांचा खोचक टोला
मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्र...
एक कॉल, एक क्लिक आणि खात्यातून उडाले 6 लाख, कॉल गर्लची सेवा विद्यार्थ्याला महागात!
वयाच्या 58 व्या वर्षी या अभिनेत्रीचे बोल्ड अन् सेमीन्यूड फोटोशूट; सोशल मीडियावर जोरदार चर्चा
नीता अंबानी चा फिटनेस ट्रेनर विनोद चन्ना आहे गडगंज श्रीमंत; सोशल मीडियावर का केलं जातंय सर्च?
वसई-विरारमध्ये 13 ठिकाणी ईडीची कारवाई, 41 बेकायदेशीर इमारती प्रकरणी छापे
Ratnagiri Crime – सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, एक जण ताब्यात; लॉजवर छाप टाकून पोलिसांनी कारवाई
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड भिकेला लागले, पैसे वाचवण्यासाठी शोएब मलिकसह 5 जणांची केली हकालपट्टी