Shirur crime news – झुबे चोरण्यासाठी महिलेचे कानच कापले! सहा महिन्यांतील तिसरी घटना
>> मुकुंद ढोबळे
शिरूर जिल्ह्याच्या विविध भागांत चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून, महिलेचे कान कापून दागिने चोरट्यांनी लांबविल्याची धक्कादायक घटना शिरूर तालुक्यातील जांबूत येथे घडली. यापूर्वी अशाच दोन-तीन घटना घडल्यामुळे घबराट पसरली आहे.
शिरूर तालुक्यातील जांबुत येथील थोरात वस्तीवर दोन अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून एका महिलेला मारहाण केली. तिच्या गळ्यातील व कानातील दागिने जबरदस्तीने ओरबाडून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत महिलेला डाव्या कानाच्या पाळीला गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना मंगळवारी (दि. 29) पहाटे दोन ते अडीचच्या सुमारास घडली. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिराबाई लक्ष्मण थोरात (वय – 52, रा. जांबुत, थोरात वस्ती) या घरात झोपलेल्या असताना दोन चोरट्यांनी खिडकी उचकटून घरात प्रवेश केला. त्यातील एकाने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेतले, तर दुसऱ्याने त्यांच्या दोन्ही कानातील सोन्याच्या कुड्या जबरदस्तीने काढून नेल्या. डाव्या कानातील कुडी निघत नसल्याने ती ओढताना त्यांच्या कानाला गंभीर जखम झाली. पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण तपास करीत आहेत.
25 नोव्हेंबर 2024
गुनाटनजीकच्या करपे वस्ती येथे चार चोरट्यांनी महिलेच्या गळ्याला चाकू लावून तिचे कान शस्त्राने कापून कानातील सोन्याचे झुबे, मंगळसूत्र, कानातील वेल, रोख रक्कम, असा 63 हजारांचा ऐवज मारहाण करून चोरून नेला आहे. 25 नोव्हेंबर 2024 रोजी ही घटना घडली.
याबाबत सोपान करपे (वय – 48) रा. गुनाट (करपेवस्ती) ता. शिरूर, जि. पुणे यांनी फिर्याद दिली आहे. सोपान करपे हे पत्नी सुमन, मुलगा राजेंद्र, सून कल्पना, मुलगा आत्माराम, सून ज्योती व नांतवंडांसह गुनाट गावातील करपे वस्ती येथे राहतात. 25 नोव्हेंबर 2024 रोजी मध्यरात्री त्यांच्या पत्नी सुमन खोलीमध्ये एकट्याच होत्या. तोंडाला काळे मास्क लावलेल्या चार चोरट्यांनी घरात घुसून त्यांना मारहाण केली. त्यांनी आरडाओरडा केला. त्यावेळी चोरट्याने त्यांच्या गळ्याला चाकू लावत गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र काढून घेतले. पण, कानातील सोन्याचे झुबे व वेल काढता येत नसल्याने चोरट्यांनी त्यांचे दोन्ही कान कापून झुबे व वेल काढून घेतले. तसेच पेटीतील तीन हजारांची रोख रक्कम चोरी करून गेले.
2 जानेवारी 2025
शिरोली सुलतानपूर येथील जगदाळे मळा येथे 2 जानेवारी रोजी वृद्ध दाम्पत्याला मारहाण करून दहा ते बारा तोळे सोन्याचे दागिने आणि सुमारे सव्वा लाखांची रक्कम चोरट्यांनी लांबवली. कानातील दागिने काढण्यासाठी चोरट्यांनी अक्षरशः कान ओरबाडले, त्यामध्ये त्या महिलेचे दोन्ही कान तुटले आहेत. या घटनेमुळे सर्वत्र घबराट पसरली आहे. तुकाराम गणपत आतकरी (वय – 72) आणि त्यांची पत्नी जिजाबाई (वय – 65) अशी चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या पती-पत्नीची नावे आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List