बेसुमार वाळूउपश्यामुळे ‘थडीं’ची शेती इतिहासजमा! पैठणपासून नांदेडपर्यंत गोदाकाठी फुलणाऱ्या ‘वाड्या’ नामशेष

बेसुमार वाळूउपश्यामुळे ‘थडीं’ची शेती इतिहासजमा! पैठणपासून नांदेडपर्यंत गोदाकाठी फुलणाऱ्या ‘वाड्या’ नामशेष

>> बद्रीनाथ खंडागळे

गोदावरीच्या पात्रातील अमर्याद वाळूउपशामुळे वाळवंट नामषेश होऊन नदीकाठ खडकाळ झाला आहे. वाळू आणि पाणी यांचा समतोल राहिला नाही. नदीकाठावर बेसुमार अतिक्रमणे झाली. यामुळे नदीकाठावर केली जाणारी ‘थडी’ची शेती इतिहासजमा झाली आहे. मासेमारी सोबतच वाळवंटात टरबूज, खरबूज, वांगी, काकडी आदी पिकांची लागवड होत असे. पण आता पैठणपासून नांदेडपर्यंत गोदाकाठी फुलणाऱ्या ‘वाड्या’ नामशेष झाल्या आहेत.

पैठण येथे जायकवाडी प्रकल्पाची ऊभारणी होण्यापूर्वी म्हणजे 55 वर्षांपूर्वी गोदावरी काठावर नांदेड पर्यंत एकेकाळी थडीची शेती केली जात होती. गोदाकाठी वसलेल्या मच्छीमार समाजाच्या वसाहती यावर अवलंबून होत्या. गोदावरीच्या काठावर दोन्ही बाजूने वाळवंट आणि मोकळा भाग होता. नदीपात्र वाहते होते. नदीच्या पात्रात रात्री जाळे लावणाऱ्या मच्छीमारांचा दिवसाही येथेच वावर होता. मासेमारी करतानाच वाळवंटात ‘थडी’ची पिके घेऊन हे मच्छिमार उपजीविकेला हातभार लावत. वांगी तसेच भाजीपाल्यासोबत उन्हाळी फळांची लागवडही या थडीच्या शेतात होऊ लागली.

थडीच्या शेतीबाबत बोलताना ‘गोदावरी मच्छीमार संस्थे’चे अध्यक्ष रमेश लिंबोरे यांनी सांगितले की, उन्हाळ्याच्या काळातही वाळवंटातील भुगर्भात ओल असते. हा ओलावा फळवेलींना पोषक असतो. अशा भुभागावर अत्यंत रसदार व रुचकर फळपिके मिळतात. सुमारे 30 ते 35 वर्षांपूर्वी ‘थडीची काकडी’, ‘थडीचे टरबूज’, ‘थडीची वांगी’ ‘थडीचे खिरे’ हे खवय्यांसाठी परवलीचे शब्द होते. आता नदीकाठावर वाळुच शिल्लक नसल्याने ओलसरपणाही राहिला नाही. त्यामुळे थडीची शेती संपुष्टात आली आहे. अशी खंतही रमेश लिंबोरे यांनी व्यक्त केली.

या पार्श्वभूमीवर मागील 20 ते 25 वर्षांपासून वाळुला होणारी मागणी आणि केला जाणारा ऊपसा याला कोणतीही मर्यादा राहीली नाही. वाळवंट जागोजागी ओरबाडले गेले. नदीकाठ खडकाळ झाला. नदीचे वाहणेही बंद झाले. वाळु आणि पाणी यांचा असमतोल झाल्याने नदीकाठावर ना वाळू राहिली ना माती. दगडी काठ असलेल्या गोदावरीचे भकास रुप सध्या पाहायला मिळत आहे.

यात भर म्हणून ठिकठिकाणी अतिक्रमणे झाली. नांदेड पर्यंत अनेक बंधारे उभे राहिले. येथे जलफुगवटा झाल्याने थडीच्या पिकांसाठी लागवडीची जागाच राहीली नाही. अशा परिस्थितीत ज्या मच्छीमार कुटुंबाकडे स्वतःची शेती होती. त्यांनी थडीच्या पिकांचे कौशल्य तेथे वापरून उन्हाळी फळपिकांची शेती चालू ठेवली आहे. परंतु अन्य मच्छीमार बांधवांनी गोदाकाठावरच्या ‘वाड्या’ नामशेष झाल्यावर मच्छीमारी हाच पारंपरिक व्यवसाय कायम ठेवला. काहींनी थडीचे कसब बटाईच्या शेतीत वापरून गोदाकाठावरच्या वाड्या शेतशिवारात आणल्या आहेत. नदिक्षेत्राबाहेर बटाईने शेती घेऊन टरबूज, खरबूज, काकडी, वांगी व खिरे ही पिके घेतली जात असून हा प्रयोग शेतकऱ्यांनाही फायद्यात पडला आहे.

नाथषष्ठी यात्रा आणि थडीचे वांगे

पैठणच्या नाथषष्ठी यात्राकाळात नदीकाठावरील थडीच्या वांग्यांना प्रचंड मागणी असायची. पायी दिंडी द्वारे आलेले हजारो वारकरी तीन दिवस फडावर वांग्याच्या भाजीचा बेत करायचे. दररोज शेकडो क्विंटल वांगी लागायची. यासाठी दिंडीप्रमुख महिनाभर अगोदर येऊन थडीवर जाऊन वांग्यांची अगोदर बुकिंग करत असत अशी माहिती कहार समाजाचे रघुनाथ इच्छय्या यांनी दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

फुले चित्रपट टॅक्स फ्री करावा, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची मागणी फुले चित्रपट टॅक्स फ्री करावा, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची मागणी
महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील ‘फुले’ सिनेमा सेंसॉरच्या कचाट्यातून सुटल्यानंतर रिलीज झाला आहे. हा एक ऐतिहासिक आणि...
‘120 कोटी रुपयांची कमाई तर केवळ…’, WAVES Summit 2025 मध्ये ओम राऊत यांनी ‘आदिपुरुष’ बद्दल सांगितले…
तर अर्धे जग आपले चित्रपट पाहील, चीनचा उल्लेख करून आमीर खान नेमकं काय म्हणाला?
Hingoli Accident – भरधाव डंपर भरबाजारात घुसला, नागरिकांना चिरडत रिक्षाला धडक; दोघांचा जागीच मृत्यू
26/11 Mumbai terror Attack – NIA ने तहव्वुर राणाचा आवाज आणि हस्तलेखनाचे घेतले नमुने
Pahalgam Terror Attack – पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं चीन कनेक्शन! बंदी असलेल्या चिनी सॅटेलाइट फोनचा वापर
Pahalgam Attack – पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच CM ओमर अब्दुल्लांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, आर्धा तास चालली बैठक