100 दिवसांच्या प्रगतीपुस्तकात मिंधे आणि अजितदादा नापास
महायुती सरकारचे 100 दिवसांच्या परीक्षेच्या निकालाचे प्रगतीपुस्तक आज जाहीर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडील सामान्य प्रशासन विभाग, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडील नगरविकास विभाग आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे कार्यभार असलेला अन्न व नागरी पुरवठा विभाग मुख्यमंत्र्यांच्या परीक्षेत सपशेल नापास झाला आहे. मात्र आदिती तटकरे यांच्या महिला व बाल विकास विभागाने 80 टक्के गुण मिळवून अव्वल क्रमांक पटकावला आहे.
राज्याच्या शासकीय कार्यालयांना शिस्त लावण्याबरोबरच नागरिकांची कामे वेगाने करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 100 दिवसांची सुधारणा मोहीम हाती घेतली होती. याचे मूल्यमापन करण्यासाठी क्वालिटी कौन्सील ऑफ इंडियाला काम दिले होते. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत मुख्यमंत्री फडणवीस यांनी एक्सच्या माध्यमातून या निकालांची माहिती दिली.
बारा विभागांचे उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण
त्यानुसार 48 विभागांपैकी 12 विभागांनी त्यांना दिलेल्या उद्दिष्टांपैकी 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. तर 18 विभागांनी 80 टक्के उद्दिष्ट साध्य केले आहे.
सर्वोत्तम जिल्हा परिषद
सर्वोत्तम जिल्हा परिषदेत ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बाजी मारली आहे. ठाणे जिल्हा परिषदेला 92 टक्के गुण मिळाले आहेत. नागपूर जिल्हा परिषद 79.43 टक्के, नाशिक जिल्हा परिषद आणि पुणे जिल्हा परिषद प्रत्येकी 75.43 टक्के आणि वाशीम जिल्हा परिषदेला 72 टक्के गुण मिळाले आहेत.
सर्वोत्तम पोलीस आयुक्त
मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तांना 100पैकी 84.57 टक्के, ठाणे पोलीस आयुक्तांना 76.57 टक्के आणि मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तांना 73.14 टक्के गुण मिळाले.
सर्वोत्तम पोलीस महानिरीक्षक/उपमहानिरीक्षक
कोकण पोलीस महानिरीक्षक 78. 86 टक्के, नांदेडच्या पोलीस महानिरीक्षकांना या कामगिरीत 61.14 टक्के गुण मिळाले आहेत.
सर्वोत्तम पालिका आयुक्त
उल्हागनगर महानगर पालिका आयुक्तांना 86.29 टक्के, पिंपरी चिंचवड महानगर पालिका आयुक्तांना 85.71 टक्के, पनवेल महानगर पालिका आयुक्त 79.43 टक्के, नवी मुंबई महानगर पालिका
आयुक्त 79.43 टक्के.
सर्वोत्तम विभागीय आयुक्त
कोकण विभागीय आयुक्त 75.43 टक्के, नाशिक विभागीय आयुक्त 62.29 टक्के, नागपूर विभागीय आयुक्त 62.29 टक्के.
सर्वोत्तम जिल्हाधिकारी
चंद्रपूर 84.29 टक्के, कोल्हापूर 81.14 टक्के, जळगाव 80.86 टक्के, अकोला 78.86 टक्के, नांदेड 66.86 टक्के.
सर्वोत्तम विभाग
महिला व बाल विकास विभाग 80 टक्के, सार्वजनिक बांधकाम विभाग 77.95 टक्के, कृषी विभाग 66.15 टक्के, ग्रामविकास विभाग 63. 85 टक्के, परिवहन व बंदरे विभाग 61.28 टक्के
सर्वोत्तम पोलीस अधीक्षक
पालघर 90.29 टक्के, गडचिरोली आणि नागपूर (ग्रामीण) प्रत्येकी 80 टक्के, जळगाव 65 टक्के आणि सोलापूर ग्रामीण 64 टक्के.
नापास विद्यार्थ्यांचे प्रगतिपुस्तक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडील सामान्य प्रशासन विभागाला 100 पैकी केवळ 24 टक्के गुण मिळाले आहेत. अजित पवार यांच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाला 33 टक्के आणि एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागाला 34 टक्के गुण मिळाले आहेत.
अजगर कधी गिळेल हे कळणारही नाही – प्रकाश आंबेडकर
मुख्यमंत्र्यांच्या परीक्षेत आदिती तटकरे यांच्या महिला बालविकास विभागाने सर्वोत्तम कामगिरी केली असेल तर त्याचे श्रेय एकनाथ शिंदे यांना द्यायला हवे. कारण शिंदे यांनीच महिलांना 1500 हजार रुपये देण्याचा निर्णय दिला होता. त्यामुळे महिलांची क्रयशक्ती वाढली, अशी खोचक प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली. तसेच शिंदे आणि अजित पवार यांनी सावध राहावे, नाहीतर अजगर त्यांना कधी गिळेल हे कळणारही नाही, असा इशारा त्यांनी दिला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List