Pahalgam Terror Attack – ISI च्या आदेशावरून दहशतवादी हल्ला, NIA चा अहवाल; पाक विरोधात मिळाले ठोस पुरावे!
कश्मीरच्या पहलगाममध्ये बैसरण येथे 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेचा (NIA) प्राथमिक तपास अहवाल समोर आला आहे. अहवालातून हल्ल्यामागील पाकिस्तानच्या कटाचा पर्दाफाश झाला आहे. पहलगामच्या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता.
NIA च्या प्राथमिक तपास अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना लश्कर-ए-तोयबा आणि पाकची गुप्तचर संस्था ISI ने मिळून हा हल्ला घडवला. हल्ल्याचा कट हा लश्कर-ए-तोयबाच्या पाकमधील मुख्यालयात ISI च्या इशाऱ्यावरून रचला गेला. हल्ल्यावेळी दहशतवादी पाकव्याप्त कश्मीरमधील आकांच्या संपर्कात होते. त्यांना पाकिस्तानमधून दिशा-निर्देश दिले गेले आणि फंडिंगही करण्यात आले, असे NIA च्या अहवालात म्हटले आहे.
पाकड्यांकडून सलग आठव्या दिवशी शस्त्रसंधीचे उल्लंघन; हिंदुस्थानचे चोख प्रत्युत्तर
हल्ल्यात सामील असलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. पाकव्याप्त कश्मीरशी ते संबंधित आहेत. हाशिम मूसा आणि अली उर्फ तल्हाभाई हे मुख्य दहशतवादी आहेत. दोन्हीही पाकिस्तानचे नागरिक आहेत आणि लश्कर-ए-तोयबाशी संबंधित आहेत. या दोघांना कश्मीरमध्ये राहणाऱ्या आदिल थोकरने मदत केली होती. पाकिस्तानी दहशतवाद्यांना स्थानिकांनीही मदत केल्याचे समोर आले आहे.
तपास पथकाने बैसरणमधील हल्ल्याची 3D मॅपिंग आणि घटनाक्रम रिक्रिएट केला. दहशतवाद्यांनी शस्त्र बेताब खोऱ्यात लपवल्याचे थ्रीडी मॅपिंगवरून स्पष्ट झाले. फॉरेन्सिक पुरावे गोळा करण्यात आले आहेत. यात घटनास्थळावरील काडतुसांच्या पुंगळ्यांचाही समावेश आहे. सर्व पुरावे फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आले आहेत. NIA च्या महासंचालकांकडून लवकरच हा अहवाल केंद्रीय गृह मंत्रालयाकडे सादर करण्यात येणार आहे. या आधारावर पाकिस्तान विरोधात आंतरराष्ट्रीय पातळीवर कारवाई केली जाईल.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List