‘त्यापेक्षा घरी बसणं पसंत केलं..’; अशोक सराफ यांनी का घेतला होता 2 वर्षांचा ब्रेक?
अशोक सराफ हे कलाविश्वातील खूप मोठं नाव. त्यांच्या नावाला इतकं मोठं वलय प्राप्त झालंय की त्यासाठी वेगळ्या कोणत्याही ओळखीची गरज भासत नाही. अशोक सराफ यांच्या करिअरची सुरुवात, त्यांनी गाजवलेल्या भूमिका, बँकेची नोकरी आणि नट म्हणून कमावलेली प्रसिद्धी.. यांविषयी सहसा सर्वांनाच माहिती आहे. परंतु त्यांच्या करिअरमधील काही ठराविक टप्प्यांविषयी फार क्वचित लोकांना जाणीव असेल. नाटक आणि चित्रपटांनंतर अशोक सराफ यांनी टीव्हीवरील सिटकॉम ‘हम पांच’मध्ये भूमिका साकारली होती. या सिटकॉमनंतर त्यांना कामाच्या असंख्य ऑफर्स येत होत्या. पण तरीसुद्धा त्यांनी दोन वर्ष घरी बसणं पसंत केलं. त्यामागे अशोक सराफ यांचा एक वेगळा विचार होता. हा किस्सा त्यांनी ‘मी बहुरुपी’ या आत्मचरित्रात उलगडला आहे.
अनेकदा माणसांना एखाद्या व्यक्तीचं केवळ यश दिसतं. त्यामागे असलेले कठोर परिश्रम, यशापयशाचे चढउतार, क्वचित आलेली निराशा, त्यातही स्वत:च्या तत्त्वांशी ठेवलेली निष्ठा, त्यामुळे सहन करावा लागलेला त्रास फार कुणाच्या लक्षात येत नाही, असं त्यांनी या आत्मचरित्रात म्हटलंय. ‘हम पांच’ ही मालिका यशस्वी झाल्यानंतर अशोक सराफ यांना अनेक ऑफर्स येत होत्या. परंतु या ऑफर्स त्याच प्रकारच्या भूमिकांच्या होत्या. अशोकमामांना पुन्हा त्याच प्रकारचं काम करायचं नव्हतं. अखेर त्या काळात त्यांनी दोन वर्षे कोणतंही काम केलं नाही. त्यावेळी त्यांना भविष्यात काय आहे याची कल्पनाही नव्हती. तरीही हवी तशी भूमिका मिळत नाही, तोपर्यंत तडजोड म्हणून मनाविरुद्ध काहीही करण्याचं त्यांनी स्पष्टपणे नाकारलं होतं. ‘त्यापेक्षा घरी बसणं पसंत केलं’ असं त्यांनी या आत्मचरित्रात लिहिलंय.
आपल्या कामावर, अभिनयावर जिवापाड प्रेम करणाऱ्या अशोक सराफ यांनी अभिनयाच्या कुठल्या शाळेत शिक्षण घेतलेलं नव्हतं. प्रत्यक्ष काम करताच ते शिकत गेले. कधी अनुभवातून सुधारत, चुकांमधू मार्ग काढत तर कधी आपल्यापेक्षा अनुभवानं आणि वयानं मोठ्या माणसांकडून शिकत ते पुढे आले. या वाटेवर त्यांना असंख्य लोकांची मदत झाली. ही वाटचाल करताना त्यांच्या लक्षात आलं की अभिनयाचं हे क्षेत्र सोपं नाही. त्याच बराच अभ्यास करावा लागतो. या अभ्यासाच्या, परिश्रमाच्या आणि अनुभवातून मिळालेल्या शिकवणीच्या जोरावर अशोक सराफ यांनी इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List