घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही, पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला इशारा
“ज्या पाकिस्तानी सैन्यावर हे दहशतवादी अवलंबून होते, त्यांना हिंदुस्थानी लष्कर, हवाई दल आणि हिंदुस्थानींनी पराभूत केले आहे. हिंदुस्थानी सैन्याने पाकिस्तानी सैन्याला दाखवून दिले आहे की, पाकिस्तानमध्ये अशी कोणतीही जागा शिल्लक नाही जिथे दहशतवादी लपून बसू शकतात. आम्ही घरात घुसून तुमच्यावर हल्ला करू आणि तुम्हाला पळून जाण्याची एकही संधी देणार नाही”, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाविरोधात कठोर कारवाईचा इशारा देत पाकिस्तानला स्पष्ट संदेश दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी पंजाबमधील आदमपूर एअरबेसवर पोहोचले. येथे त्यांनी हवाई दलाच्या जवानांची भेट घेतली आणि त्यांना संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी हा इशारा दिला आहे.
आदमपूर एअरबेसवर सैनिकांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “जेव्हा आमच्या बहिणी आणि मुलींचे कुंकू हिसकावून घेतलं गेलं, तेव्हा आम्ही दहशतवाद्यांच्या घरात घुसून त्यांना ठार केलं. ते म्हणाले, “ते भित्र्यासारखे लपून आले, पण ते विसरले की ज्याला त्यांनी आव्हान दिले होते, ते हिंदुस्थानी सैन्य होते. तुम्ही (वायुसेने) त्यांच्यावर समोरून हल्ला करून त्यांना ठार मारले. तुम्ही सर्व दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. 9 अड्डे उद्ध्वस्त झाले आणि 100 हून अधिक दहशतवादी मारले गेले.”
पंतप्रधान मोदी म्हणाले, “तुमच्या शौर्यामुळे आज ऑपरेशन सिंदूरचा आवाज कानाकोपऱ्यात ऐकू येत आहे. या ऑपरेशन दरम्यान प्रत्येक हिंदुस्थानी तुमच्यासोबत उभा राहिला. आज देशातील प्रत्येक नागरिक आपल्या सैनिकांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा आभारी आहे. ऑपरेशन सिंदूर ही सामान्य लष्करी कारवाई नाही. ती हिंदुस्थानच्या धोरणाचा, हेतूचा आणि निर्णायकतेचा त्रिवेणी संगम आहे.”
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List