भिवंडीत अग्नितांडव; 22 गोदामे खाक, कपडे, बूट, फर्निचर, कॉस्मेटिक जळून नष्ट
गोदामांचे शहर अशी ओळख असलेल्या भिवंडी शहरातील वडपे गावात आज पहाटे भीषण आग लागली. रिचलॅण्ड कॉम्प्लेक्स या भल्यामोठ्या गोदाम संकुलात झालेल्या अग्नितांडवात 22 गोदामे खाक झाली आहेत. या विविध गोदामांमधील कपडे, बूट, फर्निचर, कॉस्मेटिक असे किमती साहित्य जळून नष्ट झाले असून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचे नेमके कारण समजले नसून तब्बल सात तासांनंतर अग्नितांडवावर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
मुंबई-नाशिक महामार्गावरील वडपे गावच्या हद्दीत रिचलॅण्ड कॉम्प्लेक्स हे भलेमोठे गोदाम संकुल आहे. पहाटेच्या सुमारास अचानकपणे ठिणग्या पडून आग लागली आणि काही क्षणातच ही आग भडकली. आगीचे वृत्त समजताच भिवंडी, कल्याण परिसरातील चार अग्निशमन दलाच्या गाड्यांनी धाव घेऊन आग विझविण्यास सुरुवात केली. मात्र पाण्याची कमतरता असल्याने त्यात अनेक अडचणी येत होत्या. केमिकल गोदामांमधील आग नियंत्रणात आणण्यासाठी फोमचा वापर करावा लागला.
आग लागलेल्या ठिकाणी के. के. इंडिया पेट्रोलियम स्पेसियालिटीज प्रा. लि., कॅनन इंडिया प्रा. लि. कंपनी, ब्राईट लाईफकेअर प्रा. लि. कंपनी, होलीसोल प्रा. लि. कंपनी, एबॉट हेल्थकेअर प्रा. लि. कंपनी अशा विविध कंपन्यांची गोदामे होती.
गोदामांमध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल, प्रिंटिंग मशीन, इलेक्ट्रॉनिक साहित्य, प्रोटीन खाद्यपदार्थ पावडर, कॉस्मेटिक साहित्य, कपडे, बूट, मंडप डेकोरेशन साहित्य व फर्निचर आदींचा साठा करण्यात आला होता. तो जळून खाक झाला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List