“कसलाच पश्चात्ताप नाही..”; अमृताला कानाखाली वाजवल्याप्रकरणी अखेर ईशाने सोडलं मौन
बॉलिवूड इंडस्ट्रीत अभिनेत्रींमधील ‘कॅट-फाइट्स’ (भांडणं) चाहत्यांसाठी काही नवीन नाहीत. अनेक अभिनेत्रींमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वाद होतच असतात. असाच एक वाद 2000 च्या मध्यात चर्चेत आला होता. अभिनेत्री ईशा देओल आणि अमृता राव यांच्यात हा वाद झाला होता. ‘प्यारे मोहन’ या चित्रपटात दोघींनी एकत्र काम केलं होतं. या चित्रपटाच्या सेटवर ईशा देओलने चक्क अमृताच्या कानाखाली मारली होती. या घटनेविषयी दोघींनी बरीच वर्षे मौन बाळगलं होतं. अखेर आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ईशाने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
अमृताने पॅकअप झाल्यानंतर दिग्दर्शक इंद्र कुमार आणि इतर क्रू मेंबर्ससमोर अपमान केल्याचा आरोप ईशाने केला. हा अपमान सहन न झाल्याने अखेर ईशाने तिच्या कानशिलात वाजवली होती. याविषयी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत ईशा म्हणाली, “होय, मी तिच्या कानाखाली वाजवली होती, कारण तिने तिची मर्यादा ओलांडली होती. तो माझ्या आत्मसन्मानाचा मुद्दा होता. मला त्या गोष्टीचा जराही पश्चात्ताप नाही, कारण त्यावेळी ती त्याच लायकीची होती.” एका अस्वीकार्य परिस्थितीत भावनेच्या भरात दिलेली ती प्रतिक्रिया होती, जे मी सहसा करत नाही, असंही ईशाने स्पष्ट केलं. टीमसमोर स्वत:साठी खंबीरपणे उभं राहणं महत्त्वाचं होतं, असं त्यावेळी ईशाला वाटलं होतं.
या घटनेनंतर अमृतासोबतचं नातं कसं आहे याविषयी ईशा पुढे म्हणाली, “तिला नंतर तिची चूक समजली आणि तिने माझी माफी मागितली. मीसुद्धा तिला माफ केलं. आता आमच्या नात्यात काही कटुता नाही. पण त्या घटनेनंतर मी अमृतासोबत काम केलं नाही. भविष्यात कधी संधी मिळाली तर मी नक्कीच तिच्यासोबत काम करेन. इतक्या वर्षांनी मी याबद्दल बोलतेय कारण, त्या घटनेविषयी बऱ्याच अफवा पसरल्या होत्या.”
“मला प्रवृत्त केल्याशिवाय असं वागणं माझा स्वभावच नाही. त्याआधी मी लारा दत्ता, सेलिना जेटली आणि बिपाशा बासू यांच्यासोबत कोणत्याही समस्येशिवाय काम केलं होतं”, असंही ईशाने या मुलाखतीत स्पष्ट केलं.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List