Justice BR Gavai : महाराष्ट्राचे भूषण गवई देशाचे 52वे सरन्यायाधीश म्हणून बुधवारी घेणार शपथ
महाराष्ट्राचे सुपुत्र न्यायमूर्ती भूषण गवई बुधवारी (14 मे 2025 रोजी) देशाचे 52 वे सरन्यायाधीश (CJI) म्हणून शपथ घेतील. राष्ट्रपती भवनात होणाऱ्या समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना शपथ देतील. निवृत्त सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या निवृत्तीनंतर न्यायमूर्ती गवई यांची मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते प्रसिद्ध राजकारणी, प्रख्यात आंबेडकरवादी, माजी खासदार आणि अनेक राज्यांचे राज्यपाल राहिलेले आर.एस. गवई यांचे पुत्र आहेत.
याआधी 49 वे सरन्यायाधीश राहिलेले उदय ललित हे महाराष्ट्राचे होते. त्यामुळे देशाच्या सर्वोच्च न्यायिक अध्यक्षपदी नियुक्ती होणारे गवई हे महाराष्ट्राचे दुसरे सुपुत्र असणार आहेत. आज (13 मे 2025) संजीव खन्ना निवृत्त झाले आहेत. कायदा मंत्रालयाने न्यायमूर्ती खन्ना यांना त्यांच्या उत्तराधिकाऱ्याची निवड करण्याची औपचारिक विनंती केली होती. त्यानुसार विद्यमान सरन्यायाधीशांनी त्यांचे उत्तराधिकारी म्हणून सर्वात वरिष्ठ न्यायाधीश म्हणून गवई यांची शिफारस केली होती. त्यामुळे न्यायमूर्ती गवई यांची नियुक्ती झाल्यास ते देशाचे 52वे सरन्यायाधीश असणार आहेत. दरम्यान, न्यायमूर्ती गवई नोव्हेंबर 2025 मध्ये निवृत्त होणार असल्याने ते केवळ सहा महिनेच देशाचे सरन्यायाधीश म्हणून काम पाहतील. गवई यांची 24 मे 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List