माढा लोकसभेत महायुतीत बंडाचे चिन्ह, तर वंचितने आणला ट्विस्ट
Mhada Loksabha election : माढ्यात महायुतीत निर्माण झालेल्या वादाने भाजपचं टेन्शन वाढलं आहे. भाजपनं रणजित सिंह निंबाळकरांना पुन्हा उमेदवारी दिल्यानं धैर्यशील मोहितेंनी भाजपचा राजीनामा दिला. ते शरद पवार गटात जाणार आहेत. रणजित सिंह मोहितेंही राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय. तर अजित पवार गटाचे नेते रामराजे निंबाळकरांचाही भाजपच्या उमेदवाराला विरोध आहे.
निंबाळकरांना विरोध
माढ्यातून भाजपचे उमेदवार रणजित सिंह निंबाळकरांना विरोध करत धैर्यशील मोहिते पाटलांनी भाजपचा राजीनामा दिला. आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून धैर्यशील मोहितेच उमेदवार राहणार हे निश्चित झाल्यानं प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी त्यांचा राजीनामा मान्य केला.
धैर्यशील मोहितेंनी कालच पुण्यात पवारांची भेट घेतली. आता ते 14 तारखेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत आणि 16 तारखेला अर्ज भरणार आहेत.
माढ्यात आता स्पष्ट झालं की भाजपच्या रणजित सिंह निंबाळकरांविरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून धैर्यशील मोहितेच असतील. माढ्यातून रणजित सिंह निंबाळकर भाजपचे विद्यमान खासदार आहेत. भाजपनं त्यांना पुन्हा तिकीट दिलं. मात्र उमेदवारी जाहीर होण्याच्याआधी पासूनच रणजित सिंहांच्या उमेदवारीला महायुतीतूनच विरोध होता. अखेर धैर्यशील मोहितेंनी बंडाचा झेंडा हाती घेतला.
शरद पवार गटाच्या वाटेवर
धैर्यशील मोहिते विजय सिंह मोहिते पाटलांचे पुतणे आहेत, ते भाजपकडून खासदारकीसाठी इच्छुक होते. विजय सिंह मोहितेचे सुपूत्र रणजित सिंह मोहिते भाजपचे विधान परिषदेचे आमदार आहेत. ते सुद्धा राजीनामा देण्याच्या तयारीत असून शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. त्यातच महायुतीतल्याच अजित पवार गटाच्या रामराजे नाईक निंबाळकरांनीही रणजित सिंह निंबाळकरांच्या उमेदवारीला उघड विरोध केला…उमेदवार बदला अशी अट रामराजेंची आहे.
नागपुरात फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपचे उमेदवार रणजित सिंह निंबाळकर, मान-खटावचे आमदार जयकुमार गोरे आणि दौंडचे आमदार राहुल कुल यांच्यात बैठक झाली. रामराजे माढ्यात भाजपच्याच उमेदवाराला विरोध करुन मदत करणार नसतील तर, बारामतीत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना मदत करणार नाही, अशी भूमिका राहुल कुल यांनी घेतल्याचं माहिती आहे..
युतीचा धर्म पाळण्याच्या सूचना
तर इकडे माढ्यावरुनच मुंबईत, देवगिरी बंगल्यावर रामराजे नाईक निंबाळकर, फलटणचे आमदार दीपक चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंसोबत बैठक झाली. ज्यात अजित पवारांनी युतीचा धर्म पाळा, अशा सूचना दिल्यात आहेत.
धैर्यशील मोहितेंनी शरद पवार गटाचा हात पकडल्यानं आता धैर्यशील मोहितेंचे चुलते आणि विजय सिंह मोहितेंचे बंधू जयसिंह मोहिते पाटलांनीही भाजपला इशारा दिलाय. आम्हाला ईडीची भीती नाही, असं जय सिंह मोहिते म्हणाले आहेत.
दुसरीकडे, भाजपचे आमदार रणजित सिंह मोहिते पाटील आमच्याच सोबत राहणार, असा विश्वास बावनकुळेंनी व्यक्त केला आहे. माढ्याच्या लढाईत आता एक एक ट्विस्ट वंचितनं आणला आहे. शरद पवार गटाकडून इच्छुक असलेले रमेश बारसकरांना आता माढ्यातूनच वंचितनं उमेदवारी दिली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List