राज ठाकरे यांनी मोदींना बिनशर्त पाठिंबा का जाहीर केला? जाणून घ्या यामागची इनसाईड स्टोरी
Raj Thackeray : बिनशर्त पाठिंबा…ना राज्यसभा…ना विधानपरिषद…फक्त आणि फक्त मोदींसाठी महायुतीला मदत करण्याची भूमिका मनसे अध्यक्षांनी घेतली. त्याचवेळी मनसे महायुतीत का आली नाही तेही राज ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितलं. मला आमच्या चिन्हावर लढा हे सांगितलं आणि तेच आपल्याला मान्य नव्हतं. रेल्वे इंजिन चिन्हावर कॉम्प्रोमाईज नाही, असं राज ठाकरे म्हणाले. अर्थात हे चिन्हं कमळ नव्हतं तर धनुष्यबाण चिन्हाचाच प्रस्ताव होता, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळं मनसेचं महायुतीत येण्यापासून फिस्कटल्याचं कळतं आहे.
19 मार्चला दिल्लीत अमित शाहांसोबत राज ठाकरेंची बैठक झाली. अमित शाहांच्या बैठकीत लोकसभेच्या 2 जागा देण्याचं ठरल्याची माहिती सूत्रांची आहे. महाराष्ट्रातल्या महायुतीच्या प्रमुख नेत्यांशी बोला असं शाहांनी राज ठाकरेंना सांगितलं. त्यानुसार 21 मार्चला मुंबईतल्या ताज लॅड्स हॉटेलमध्ये मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांसोबत राज ठाकरेंची दीड तास बैठक झाली. याच बैठकीत मुख्यमंत्री शिंदेंनी राज ठाकरेंसमोर धनुष्यबाण चिन्हावर लढण्याचा प्रस्ताव ठेवल्याचं सूत्रांकडून समजतंय.
मात्र रेल्वे इंजिनशिवाय लढणार नाही यावर राज ठाकरे ठाम राहिले आणि अखेर महायुतीत न येता बाहेरुन पाठींबा जाहीर केला. चिन्हाचा प्रस्ताव आपल्याला मान्य नव्हता असं राज ठाकरेंनी म्हटल्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी भाजपची बाजू स्पष्ट केली. आम्ही राज ठाकरेंसमोर कमळच चिन्हाचा प्रस्ताव ठेवलाच नव्हता आणि तसं करणारही नाही असं बावनकुळे म्हणाले. बावनकुळेंचं हेच वक्तव्य धनुष्यबाण चिन्हाच्या प्रस्तावाचा पुष्टीही देतं.
धनुष्यबाण चिन्हावर जर राज ठाकरेंनी उमेदवार दिले असते तर मनसेच्या रेल्वे इंजिन चिन्हाच्या अस्तित्वावरच सवाल उपस्थित झाला असता. ते राज ठाकरेंना मान्य होणारं नव्हतंच. शिंदेंच्या एकत्र येण्याच्या ऑफरचा खुलासा करतानाच राज ठाकरेंनी अजब प्रतिक्रिया व्यक्त केली.
अर्थात चिन्हावरुन फिस्कटल्यावर महायुतीत मनसे आली नसली तरी, राज ठाकरेंनी महायुतीला दिलेल्या बिनशर्त पाठींब्यावरुन विरोधक तुटून पडलेत. तर धाक दाखवल्यामुळं मनसेनं पाठिंबा दिला का ? अशी टीका राऊतांनी केली आहे.
राज ठाकरेंनी कालच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात घेतलेल्या भूमिकेवरुन आताच्या भूमिकांवरुनही चर्चा सुरु झाली.
2009 मध्ये मनसेनं पहिल्यांदा स्वबळावर निवडणूक लढली.
2014 मध्ये मोदींना पाठिंबा देत फक्त शिवसेनेच्या विरोधात उमेदवार दिले.
2019 मध्ये लाव रे तो व्हिडीओ म्हणत मोदींना विरोध करत आघाडीच्या बाजूनं प्रचार केला.
आता 2024 मध्ये पुन्हा मोदींना राज ठाकरेंनी बिनशर्त पाठींबा दिला.
आणि हा पाठींबा ईडीमुळं दिला का ? असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनीही केला आहे. स्वत:च राज ठाकरेंनी मनसे लोकसभा लढणार नाही हे स्पष्ट केलं. आणि विधानसभेसाठी कामाला लागा अशा सूचनाही दिल्या. मात्र पाठिंबा दिल्याप्रमाणं राज ठाकरे प्रचार करतानाही दिसतील.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List