मान गादीला, मत गादीला… नवं कॅम्पेन कुठे? कोल्हापूर की साताऱ्यात?
महायुतीने अजूनही साताऱ्याची जागा जाहीर केलेली नाही. त्यामुळे साताऱ्यातून उदयनराजे भोसले उभे राहणार की नाहीत? याबाबतची शंका व्यक्त केली जात आहे. महाविकास आघाडीने कोल्हापूरमधून शाहू महाराज छत्रपती यांची उमेदवारी जाहीर केली आहे. शाहू महाराज यांनी कोणतीही उमेदवारी न मागता त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडी आणि ओबीसी बहुजन पार्टी हे दोन्ही पक्ष महाविकास आघाडीचा भाग नाहीत. तरीही त्यांनी शाहू महाराज यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शाहू महाराज यांचं पारडं जड झालं असलं तरी कोल्हापूरकरांनी गाफिल न राहण्याचं ठरवलं आहे. महाराजांना विजयी करण्यासाठी मान गादीला, मत गादीला… असं कॅम्पेन कोल्हापूरकरांनी सुरू केलं आहे.
काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी याबाबतची माहिती दिली आहे. शाहू महाराज यांच्या प्रचाराचा आमचा एक राऊंड ऑलरेडी पूर्ण झाला आहे. कोल्हापूरच्या जनतेच्या मनात कोल्हापूरच्या मातीतील छत्रपतींचं व्यक्तिमत्त्व दिल्लीला पाठवायचं असा विचार आहे. त्यामुळे मोठ्या मताधिक्याने आमची सीट निवडून येईल, असा विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केला.
कोल्हापूरच्या अस्मितेची लढाई
वैयक्तिक टीकांवरही त्यांनी भाष्य केलं. दोन्हीकडून वैयक्तिक टीका होणं अपेक्षित नाही. आम्ही आमच्या पातळीवर सूचना दिल्या आहेत. शाहू महाराज यांना लोकसभेत पाठवण्यासाठी लोक असूसले आहेत. शाहू महाराजांसदर्भात चुकीचे मेसेज तिकडून येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळेच मी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे. मी स्वत: तीन दिवसांपूर्वी तक्रार नोंदवली आहे. ही कोल्हापूरच्या अस्मितेची आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची लढाई आहे. मान गादीला आणि मत गादीला हे कॅम्पेन आम्ही सुरू केलं आहे, अशी माहिती सतेज पाटील यांनी दिली.
कोल्हापुरात सांगलीचे पडसाद नाही
सांगलीच्या जागेबाबतही सतेज पाटील प्रतिक्रिया व्यक्त केली. सांगलीच्या जागेचे पडसाद कोल्हापूरमध्ये नाहीत. कोल्हापूरमध्ये शिवसेना ताकतीने काम करत आहे. उद्धव ठाकरे देखील शाहू महाराजांकडे येऊन गेले. मधल्या काळात भाजपच्या माध्यमातून काही अफवा पसरवल्या गेल्या. सांगलीबाबत वरिष्ठ पातळीकडून आम्ही अजूनही आशावादी आहोत, असं ते म्हणाले. पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची भूमिका योग्य आहे. त्यांनी निर्णय घेतला आहे. मात्र वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करणे काँग्रेस म्हणून आमचा प्रयत्न सुरू आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
निर्णायक भूमिका घेणारा लोकप्रतिनिधी
संजय मंडलिक यांच्यावरही त्यांनी भाष्यट केलं. आताची लढाई ही वैचारिक लढाई आहे. या वैचारिक लढाईत शाहू महाराजांनी उतरावे ही कोल्हापूरकरांची इच्छा होती. सध्या देशातील वातावरण गढूळ झालं आहे. या वातावरणात शाहू महाराज यांच्या रुपाने निर्णायक भूमिका घेणारा लोकप्रतिनिधी दिल्लीत गेला पाहिजे. त्यासाठी त्यांना जनतेने लोकसभेला उभं केलं आहे, असंही त्यांनी सांगितलं.
आठ दिवसात काय होईल सांगता येत नाही
साताऱ्याची जागा राष्ट्रवादीला गेली तर साताऱ्यामधून उमेदवार निवडून आणण्यास पृथ्वीराज चव्हाण यांचा महत्त्वाचा वाटा असेल. पुढील आठ दिवसात काय होईल सांगता येत नाही, असं सूचक विधान त्यांनी केलं.
चव्हाण यांना सुनावले
भाजप नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसमध्ये काय राहिलंय? असा सवाल केला होता. त्यावरून सतेज पाटील यांनी चव्हाण यांना चांगलंच फटकारलं. काँग्रेसमध्ये काय राहिलं हे जूनमध्येच संपूर्ण महाराष्ट्र बघेल. महाराष्ट्रात काँग्रेस जिवंत आहे आणि ताकदीने उभी आहे. महाराष्ट्रात काँग्रेसची ताकद काय आहे हे स्पष्टपणे दिसेल, अशा शब्दात त्यांनी चव्हाण यांना सुनावले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List