पिंपरी-चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेच्या पाठपुराव्याला यश
सोसायट्यांचा ओला कचरा महापालिका पूर्ववत उचलणार; प्रशासनाने घेतला निर्णय
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांकडून ओला कचरा उचलण्यास नकार देणाऱ्या निर्णयाला अखेर मवाळ भूमिका घेत, ओला कचरा पूर्ववत उचलण्याचा निर्णय घेतला आहे.
पिंपरी-चिंचवड | पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांकडून ओला कचरा उचलण्यास नकार देणाऱ्या निर्णयाला अखेर मवाळ भूमिका घेत, ओला कचरा पूर्ववत उचलण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामागे पिंपरी-चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेने केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा, प्रशासनाशी झालेल्या बैठका, विविध अधिकाऱ्यांना दिलेली निवेदने आणि आंदोलनाचा दिलेला इशारा महत्त्वाचा ठरल्याची भावना संघटनेने व्यक्त केली आहे.
संघटनेने या विषयावर महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, आरोग्य विभाग तसेच संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन सोसायट्यांच्या अडचणी सविस्तर मांडल्या होत्या. शहरातील अनेक सोसायट्यांकडे कंपोस्टिंग प्रकल्पासाठी आवश्यक जागा नसल्याने हा निर्णय व्यवहार्य नसल्याचे संघटनेने ठामपणे मांडले होते. तसेच गरज पडल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचाही इशारा देण्यात आला होता.
या सर्व प्रयत्नांनंतर महापालिका प्रशासनाने निर्णयात बदल करून सोसायट्यांचा ओला कचरा पूर्ववत उचलण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे संघटनेने स्वागत केले असून, प्रशासनाने नागरिकांच्या भावना आणि अडचणींचा सकारात्मक विचार केल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
“हा केवळ आमच्यासंघटनेचा विजय नसून पिंपरी-चिंचवडमधील हजारो हाऊसिंग सोसायट्या आणि लाखो नागरिकांच्या एकजुटीचा विजय आहे. आम्ही सुरुवातीपासूनच पर्यावरण संवर्धनाला विरोध केला नाही; मात्र व्यवहार्य अंमलबजावणीची मागणी केली. प्रशासनाने आमचे म्हणणे ऐकून सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल आम्ही त्यांचे स्वागत करतो. भविष्यातही नागरिकांच्या हितासाठी संघटना अशाच पद्धतीने ठामपणे आवाज उठवत राहील.”
- सत्यब्रत त्रिपाठी, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List