‘टीईटी’ पेपर फोडण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, 9 जणांना अटक; अटक झालेल्यांत चार शिक्षकांचा समावेश
राज्यभरात आज शिक्षक पात्रता परीक्षा (टी.ई.टी.) सुरू असतानाच या परीक्षेचा पेपर फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला. मुरगूड पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने केलेल्या संयुक्त कारवाईत 9 जणांना अटक करण्यात आली असून, 9 संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. कारवाईत पथकाने सुमारे 16 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक केलेल्यांमध्ये चार शिक्षकांचा समावेश आहे. मात्र, मुख्य सूत्रधार फरार आहे.
आज राज्यभरात अनेक केंद्रांवर ही परीक्षा सुरू होती. कोल्हापूर जिह्यात हा पेपर फोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळाल्यावर मुरगूड-निपाणी रस्त्यावर सोनगे येथील गुरुकृपा फर्निचर मॉलच्या कार्यालयावर रविवारी पहाटे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर व मुरगूड पोलिसांनी छापा टाकला.
याप्रकरणी अटक झालेल्यांत चार शिक्षकांचा समावेश आहे. तपास पथकाने याप्रकरणी दत्तात्रय आनंदा चव्हाण (32), गुरुनाथ गणपती चौगले (38), अक्षय नामदेव कुंभार (27), किरण साताप्पा बरकाळे (30), नागेश दिलीप शेंडगे (30), राहुल अनिल पाटील (31), दयानंद भैरू साळवी (41), अभिजित विष्णू पाटील (35), रोहित पांडुरंग सावंत (35) यांना अटक केली आहे, तर 9 संशयितांना ताब्यात घेतले आहे. महेश भगवान गायकवाड हा मुख्य सूत्रधार असल्याचा संशय असून तो फरार आहे.
टीईटी परीक्षा रविवार, 23 रोजी होती. या परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांकडून त्यांची मूळ कागदपत्रे व काही रक्कम घेऊन परीक्षेपूर्वी पेपर देतो असे सांगून फसवणूक करणारी टोळी कागल व राधानगरी तालुक्यात कार्यरत होती. या टोळीतील दत्तात्रय चव्हाण व गुरुनाथ चौगले हे दोघे राधानगरी तालुक्यात राहणारे असून, ते टीईटी परीक्षेच्या अगोदर रात्रीच्या वेळी विद्यार्थ्यांना पेपरची झेरॉक्स तीन लाख रुपयांना देणार असल्याची माहिती कोल्हापूर जिल्हय़ाचे पोलीस अधीक्षक योगेशकुमार यांना मिळाली होती. माहितीच्या आधारे त्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना तपासाच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव तसेच मुरगूड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी करे, स्थानिक गुन्हे शाखेचे व मुरगूड पोलीस ठाण्याकडील पोलीस अंमलदार व महिला पोलीस अंमलदार यांची वेगवेगळी चार तपास पथके तयार केली. पथकाने सोनगे (ता. कागल) येथील शिवकृपा फर्निचर मॉल या दुकानामध्ये 23 नोहेंबर रोजी पहाटे सव्वाएकच्या सुमारास छापा टाकला. छाप्यात अटक केलेल्यासह पाच विद्यार्थीही होते. या ठिकाणाहून वेगवेगळ्या शिक्षण संस्थेची वेगवेगळ्या विद्यार्थ्यांची नावे असलेली पदविकेची मूळ कागदपत्रे, कोरे चेक व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List