गणित जुळवलं तर गद्दार आमदार संतोष बांगर जेलमध्ये दिसतील, खासदार नागेश पाटील यांचा इशारा
हिंगोली नगर परिषदेत काहीतरी कमी-जास्त झालेले दिसतय. मिंधे गटाचे गद्दार आमदार संतोष बांगर यांच्या पायाखालची वाळू घसरली की काय’ असा प्रश्न उपस्थित करत, आम्ही गणित जुळवले तर बांगर एका दिवसात जेलमध्ये दिसतील, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी दिला.
हिंगोली नगर परिषदेसाठी नगराध्यक्षा म्हणून महाविकास आघाडी शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार अर्चना श्रीराम भिसे यांना हिंगोलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी गद्दार आमदार संतोष बांगर यांनी शिवसेनेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्याबद्दल संभ्रम निर्माण करण्याचे वक्तव्य केले आहे.
या वक्तव्याचा खासदार आष्टीकर यांनी समाचार घेत संतोष बांगर यांची चांगलीच खरडपट्टी काढली. त्यांनी स्वतःचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. यात खासदार आष्टीकर म्हणाले की, मागील काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे काही निष्ठावंत खासदार मिंधे गटात येणार असल्याच्या अफवा पसरविण्यात आल्या होत्या, त्याला आता ब्रेक लागला आहे. हिंगोलीत लय टर्रर्रऱ्या मारू लागले, काही कमी-जास्त झाले आहे का? आमच्याबद्दल काही डावपेच टाकावे लागत आहे का? असे काहीही बोलून फरक पडणार नाही, लोकांना दंडाच्या बेंडकुळ्या दाखवून काही होत नाही, हात जोडावे लागतात, असा टोला त्यांनी लगावला.
नकली नोटांचा हिशेब द्यावा लागणार
गद्दार बांगर यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यामुळे त्यांना सर्व जनताही त्यांच्या सारखीच बेईमान दिसत आहे. संतोष बांगर यांच्या जिल्हाभरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांमुळे युवकांसह तरुण पिढी व अनेक घरांतील कर्ते पुरूष बरबाद होत आहेत’ हिंगोलीत मागील काही दिवसांपूर्वी करोडो रुपयांच्या नकली नोटा सापडल्या आहेत, याचाही हिशोब त्यांना लवकरच द्यावा लागणार असल्याचा इशारा खासदार आष्टीकर यांनी दिला आहे.
मातोश्री आमचे मंदिर
हिंगोली लोकसभेत शिवसेना-महाविकास आघाडीच्या पाच ते सहा नगर परिषदांच्या नगराध्यक्षांसह उमेदवार मोठ्या संख्येने निवडून येण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे संतोष बांगर तुमच्यासारखे दीड दिवसात इमान विकणारे आम्ही नाहीत. ‘मातोश्री’ हे आमचं मंदिर आहे आणि राहणार असल्याचे ते म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List