‘हरित ठाणे’ कोमेजतंय… घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी दीड हजार झाडांची कत्तल

‘हरित ठाणे’ कोमेजतंय… घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी दीड हजार झाडांची कत्तल

 ‘येथे प्रदूषणाने सारेच वेढलेले.. घेऊ कसा कुठे मी स्वच्छंद श्वास आता..’ असे म्हणण्याची वेळ ठाणेकरांवर आली आहे. ‘स्वच्छ ठाणे.. हरित ठाणे’ ही घोषणा ठाणे महानगरपालिकेने काही वर्षांपूर्वी केली, पण आता हेच ठाणे कोमेजत चालले आहे. घोडबंदर रस्त्याच्या रुंदीकरणासाठी दीड हजार झाडांची आतापर्यंत कत्तल करण्यात आली असून फक्त ४१५ वृक्षांचे पुनर्रोपण झाले आहे. बेसुमार वृक्षतोडीमुळे शहरातील हिरवाई नष्ट होत असल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये संताप व्यक्त होत आहे.

कुणीही मागणी केली नसताना महापालिकेने कापूरबावडी ते गायमुख या घोडबंदर मार्गाच्या रुंदीकरणाचा घाट घातला. १०.१५ किलोमीटरचा हा रस्ता पूर्णपणे काँक्रीटचा केला जात आहे. एमएमआरडीएमार्फत हे काम सुरू असून त्यासाठी अंदाजे ५६० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या मार्गाच्या दोन्ही बाजूला असलेल्या सर्व्हिस रोडचे विलीनीकरण करण्यात येत आहे. या सर्व्हिस रोडवर पूर्वी महापालिकेने २ हजार १९६ झाडे लावली. त्यामुळे हवेची गुणवत्ताही राखण्यास मदत झाली.

– घोडबंदर रोडच्या रुंदीकरणाचे काम एमएमआरडीएमार्फत सुरू असून त्यासाठी १ हजार ६४६ झाडे तोडण्याची परवानगी महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाने दिली आहे.

– सप्टेंबरपर्यंत १ हजार ३१० झाडे तोडली असून ही संख्या आणखी मोठी असण्याची शक्यता आहे. सध्या जेसीबी व अन्य साधनांच्या मदतीने मोठमोठ्या झाडांची बेसुमार कत्तल केली जात आहे.

– झाडे तोडताना एमएमआरडीएच्या ठेकेदार व उपठेकेदाराने सर्व नियम पायदळी तुडवले आहेत. रात्रीच्या अंधारात गुपचूप ही झाडे तोडून ती परस्पर नेण्यात येतात.

झाडांचे पुनर्रोपण केले तरी कुठे?

ठाणे महापालिकेने एमएमआरडीएच्या ठेकेदाराला झाडे तोडण्याची फक्त परवानगी दिली आहे. त्याशिवाय ५४९ वृक्षांचे पुनर्रोपण करण्याची अटही घातली, पण हे पुनर्रोपण नेमके कुठे केले? कोणी केले? झाडे कोणती तोडली? याची कोणतीही माहिती महापालिकेकडे नाही. तसेच या वृक्षतोडीवर देखरेख ठेवण्यासाठी पालिकेचा एकही अधिकारी उपस्थित नसतो. ही आमची नव्हे तर एमएमआरडीएची जबाबदारी आहे असे सांगून पालिकेच्या अधिकाऱ्यांनी हात झटकले आहेत.

बचावासाठी शिवसैनिक धावले

घोडबंदर रोडच्या रुंदीकरणात मनमानीपणे वृक्षतोड सुरू असल्याचे समजताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पुर्णेकर, अंगद मोरे, आयुष घोडेकर, दया वर्मा, नितीन गवारी आदींनी कासारवडवली येथील बसस्टॉपजवळ धाव घेतली. शिवसैनिकांना बघताच ठेकेदाराचे कामगार पळून गेले. रात्रीच्या वेळी झाडे तोडू नयेत म्हणून उशिरापर्यंत शिवसैनिकांनी तिथे ठिय्या मांडला. एक झाड दहा कुटुंबांना ऑक्सिजन पुरवते. त्यामुळे ही वृक्षतोड त्वरित थांबवा, अन्यथा मोठे आंदोलन उभारू असा इशारा शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी दिला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

रानडुकराची अवैध शिकार; नऊ आरोपींना वनकोठडी रानडुकराची अवैध शिकार; नऊ आरोपींना वनकोठडी
वनपरीक्षेत्र कराड अंतर्गत कासारशिरंबे–बेलवडे रस्त्यावर रानडुकराच्या अवैध शिकारीप्रकरणी वन विभागाने नऊजणांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना चार दिवसांची वनकोठडी सुनावली...
सांगली महापालिकेत ‘कहीं कुशी कहीं गम’, माजी महापौर, उपमहापौरांसह अनेक दिग्गजांना धक्का
‘जयवंत शुगर’ची ऊस वाहतूक शेतकऱ्यांनी रोखली, शनिवारी दर जाहीर करण्याचे लेखी आश्वासन
अंगणात खेळणाऱ्या पाच वर्षांच्या चिमुरडीला बिबटय़ाने उचलून नेले, खारे कर्जुने येथील घटनेने घबराट
बालविवाहाचे अकोलेत आणखी दोन गुन्हे दाखल
अहिल्यानगरमधील जैन मंदिर ट्रस्ट भूखंड प्रकरणाचा सखोल तपास करा, शिवसेनेचे किरण काळे यांचे धरणे आंदोलन स्थगित
मंत्र्यांच्या वर्चस्वामुळे संयोजकांवर गुन्हा नाहीच; बोरगावात बैलगाडा शर्यतीवेळी वृद्धाच्या मृत्यूसह अनेक जखमी, सांगलीकरांमधून संताप व्यक्त