दिल्ली बॉम्बस्फोटाचे मुंब्य्रात धागेदोरे, इब्राहिम आबिदी याच्यावर पोलिसांचा वॉच
लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोटाचे धागेदोरे मुंब्य्रापर्यंत पोहोचले आहेत. एटीएसने मंगळवारी कौसा येथील इब्राहिम आबिदी या शिक्षकाच्या घराची झडती घेतली. त्याला ताब्यात घेऊन सोडले असले तरी पोलीस वॉच ठेऊन आहेत. स्फोटातील मुख्य आरोपी पुलवामाचा डॉक्टर उमर उन नबी आणि त्याचा मित्र डॉ. मुझम्मिल शकील यांच्या तुर्कस्तान भेटीचे तपशील खणून काढण्याचे काम सुरू आहे.
बॉम्बस्फोटाचा कट जानेवारी महिन्यापासूनच शिजत होता. दहशतवाद्यांनी लाल किल्ल्याची अनेकदा रेकीही केली होती. आय-20 कारमध्ये बसून स्फोट घडवणारा उमर नबी याने शकील यांच्या पासपोर्टवर तुर्कस्तानात प्रवास केल्याचे आढळून आले आहे. 2021 मध्ये हे दोघे तेथे गेले होते. या दौऱ्यानंतरच ते दहशतवादी बनले. स्फोटातील आणखी एक आरोपी डॉ. शाहीन शाहिद ही गेल्या दोन वर्षांपासून स्फोटकांची जमवाजमव करीत होती, असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुझम्मिल गनी याने जानेवारीमध्ये अनेकदा लाल किल्ल्याची रेकी केली होती. लाल किल्ला परिसरातील सुरक्षा व्यवस्था आणि गर्दीच्या वेळांची माहिती घेतली होती. मुझम्मिलने यासाठी उमरची मदत घेतली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. दिल्ली बॉम्बस्फोटाशी फरिदाबादचा संबंध असल्याने तपास यंत्रणांनी बुधवारी अल फलाह विद्यापीठात जाऊन चौकशी केली.
आणखी एक कार जप्त
फरिदाबाद पोलिसांनी उमर नबीच्या नावे नोंदणी असलेली लाल रंगाची फोर्ड इकोस्पोर्ट कार शोधून काढली आहे. हरयाणातील फरीदाबाद जवळच्या खंदावली गावातून ही कार जप्त करण्यात आली. स्फोट घडवून आणण्याआधी वेगवेगळ्या कामासाठी या कारचा वापर करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे.
लग्नात गाठीभेटी झाल्या आणि…
डॉ. आदिल अहमदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. श्रीनगर मेडिकल कॉलेजात शिकताना आदिलचा संबंध जैश-ए-मोहम्मदच्या नेटवर्कशी आला. तिथे त्याचे ब्रेनवॉश करण्यात आले. आदिलचे लग्न 4 ऑक्टोबर रोजी जम्मू-कश्मीरमधील रुपैया नावाच्या सर्जनशी झाले. या लग्नात आदिलने अनेक डॉक्टरांना बोलावले होते. त्यात स्फोटातील आरोपीही होते. त्यानंतरच खऱ्या अर्थाने टेरर मॉडय़ुल सक्रिय झाले. तिथेच कट आखण्यात आला.
केंद्र सरकार म्हणाले, हा दहशतवादी हल्लाच
दिल्लीत लाल किल्ल्याजवळ झालेला बॉम्बस्फोट हा दहशतवादी हल्लाच होता, असे केंद्र सरकारने आज स्पष्ट केले. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या स्फोटाच्या निषेधाचा ठराव मंजूर करण्यात आला. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल हे उपस्थित होते. हा भ्याड हल्ला राष्ट्रविरोधी शक्तींनी घडवून आणली आहे. हे अतिशय हीन कृत्य आहे, असे अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर सांगितले.
6 डिसेंबर रोजी हल्ल्याचा होता कट
बाबरी विध्वंसाच्या दिवशी, म्हणजेच 6 डिसेंबर रोजी मोठे स्फोट घडवून आणायचे अशी मूळ योजना होती. मात्र, मुझम्मिल शकील व इतरांच्या अटकेमुळे ही योजना फसली.
पंतप्रधानांनी केली जखमींची विचारपूस
भूतान दौऱ्यावरून परतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज थेट दिल्लीतील एलएनजेपी रुग्णालयात गेले. तिथे त्यांनी बॉम्बस्फोटात जखमी झालेल्या नागरिकांची भेट घेऊन विचारपूस केली.
आबिदीची कसून चौकशी
आबिदीची दुसरी बायको कुर्ल्यात राहत असून तिच्या घराचीही पोलिसांनी आज झडती घेतली. आबदी हा लहान मुलांना कट्टरतावादाचे धडे द्यायचा असाही संशय आहे. एटीएसने त्याच्या घरातून मोबाइल, संगणक आदी साहित्य ताब्यात घेतले आहे. तूर्त त्याला अटक करण्यात आली नसली तरी जप्त केलेल्या साहित्याच्या आधारे अधिक चौकशी सुरू आहे. आबिदी कोणाच्या संपर्कात होता, याची माहिती पोलीस घेत आहेत. एटीएससह विविध सुरक्षा यंत्रणा त्याच्यावर वॉच ठेवून आहेत.
स्फोटामागे सहा डॉक्टर
दिल्ली स्फोटामागच्या व्हाइट कॉलर टेरर मॉड्युलमध्ये सहा डॉक्टरांचा सहभाग आहे. यातील मुझम्मिल गनी, आदिल अहमद, उमर नबी, सज्जाद मलिक हे चौघे काश्मिरी आहेत. शाहीन सईद ही महिला डॉक्टर लखनऊची आहे. तर, अहमद मोहिउद्दीन सय्यद हा हैदराबादचा रहिवासी आहे.
- उमर नबी हा कटाचा महत्त्वाचा सूत्रधार होता. ज्या कारचा स्फोट झाला, ती उमर नबी चालवत होता असे समजते.
- डॉ. आदिल अहमद याला सहारनपूरमधून अटक करण्यात आली. तो मूळचा कुलगामचा आहे. तो मुझम्मिल आणि उमरच्या सतत संपर्कात होता.
- मुझम्मिल हा टेरर मॉड्युलमधील एक महत्त्वाचा मोहरा आहे. स्फोटाच्या दिवशी पोलिसांनी त्याच्याच घरातून 360 किलो स्फोटके जप्त केली होती.
- डॉ. शाहीन सईद ही मुझम्मिलची मैत्रीण होती. मुझम्मिल पकडला गेल्याने ती घाबरली होती. त्या भीतीतून तिने शस्त्रास्त्रे लपवण्याचा प्रयत्न केला आणि ती पकडली गेली.
- मोहिउद्दीन सय्यद याला गुजरात एटीएसने 8 नोव्हेंबर रोजी अटक केली आहे. त्याने चीनमधून एमबीबीएसची डिग्री घेतली आहे.
- सज्जाद मलिक याला मंगळवारी पोलिसांनी अटके केली. तो उमर नबीचा मित्र आहे. त्याचा कटात सहभाग होता का, याची चौकशी सुरू आहे.
- इब्राहिम आबिदी हा कौसा येथील इफायात हाउसिंग सोसायटीत एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहतो. तो तेथील एका मदरशाशी संबंधित आहे. याशिवाय तो कुर्ला येथील एका मशिदीत दर रविवारी उर्दू शिकवायला जातो.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List