Nanded News – कुंडलवाडीत 21 लाख 50 हजारांची रोकड जप्त; आचारसंहिता काळातील मोठी कारवाई
आगामी नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने नांदेडमध्ये एसएसटी पथकाची नियुक्ती करण्यात आली असून या ठिकाणी वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यातील कुंडलवाडी येथील जकात नाका येथे बुधवारी सायंकाळी ४ वाजता एका कारमध्ये २१ लाख ५० रुपयांची रक्कम एसएसटी पथकाने जप्त केली आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी भेट दिली आहे. सध्या नगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने या काळात ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.
नगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता सुरू असून आचारसंहिता काळात कुंडलवाडी शहरात येणारे प्रत्येक वाहनांची तपासणी करण्याकरीता जकात नाका येथे एसएसटी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. एसएसटी पथकाने बुधवारी सायंकाळी ४ वाजता बिलोलीकडून कुंडलवाडी शहराकडे येणाऱ्या एका कारला अडवत तपासणी केली असता कारमध्ये २१ लाख ५० हजार रुपयांची रक्कम एका लोखंडी पेटीमध्ये आढळून आली. सदरील रक्कम एसएसटी पथकाने ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू केली आहे.
घटनास्थळी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सायंकाळी 6 वाजेच्या दरम्यान भेट दिली असून सदरील रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या रकमेबाबत चौकशी सुरू आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत ही रक्कम ट्रेझरी कार्यालयात जमा करण्यात येणार असून चौकशीनंतर पुढील कारवाई करणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी दिली.
नायब तहसीलदार अनिल परळीकर, मुख्याधिकारी दीपक मोरे, धर्माबाद उपविभागाचे उपविभागीय अधिकारी दशरथ पाटील, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र मांजरमकर यांनी घटनास्थळी भेट दिली. ही कारवाई एसएसटी पथकातील विशाल चंदापुरे, अभिजीत धुप्पे, निशिकांत अप्पाने, पोलीस कर्मचारी मिर्झा फैय्याज बेग यांनी केली. सदरची रक्कम कुणाची, वाहन कुणाचे व कुठल्या पक्षाकडून ही रक्कम आली याचा तपास होत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List