मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात संगमेश्वरचा 114 वर्ष जुना ब्रिटीशकालीन डाकबंगला जमीनदोस्त होणार
ब्रिटीश काळात त्यांच्या अधिकाऱ्यांसह अभियंत्यांच्या निवासासाठी उभारलेले डाकबंगले आजही कोकणची शान म्हणून ओळखले जात आहेत. मजबूत काळ्या दगडांचे बांधकाम, सुंदर निसर्ग, उत्तम रचना यासाठी प्रसिध्द असणारे हे डाकबंगले ब्रिटीश अधिकाऱ्यांचे आवडते ठिकाण असायचे. स्वातंत्र्यानंतरही याचा वापर शासकीय निवासस्थाने म्हणून होवू लागला. संगमेश्वर येथे १९११ साली सोनवी आणि शास्त्री नद्यांच्या संगमासमोर उभारलेला आणि हेरिटेज वास्तू म्हणून ओळखला जाणारा डाकबंगला आता चौपदरीकरणा दरम्यान ११४ वर्षानंतर आता थोड्याच दिवसात जमीनदोस्त होणार आहे .
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे रखडलेले काम आता वेगाने हाती घेण्यात आले आहे. चौपदरीकरणात संगमेश्वर येथील ब्रिटिशकालीन डाकबंगला आता उध्वस्त होणार आहे. संगमेश्वरची भौगोलिक रचना नद्या, डोंगर अशी विचित्र असल्याने आणि एका बाजूने कोकण रेल्वे मार्ग जावून रेल्वेने पूर्वीच अधिक जमिन अधिगृहीत करुन ठेवल्याने मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण करताना संगमेश्वर येथे अनेक कसरती कराव्या लागत आहेत. सर्वेक्षण करताना अथक प्रयत्न करुनही १९११ सालची ब्रिटीशकालीन हेरिटेज वास्तू वाचविणे अशक्य झाले.
संगमेश्वर जवळ अनेक ब्रिटीशकालीन दगडी पूल आहेत. या पुलांच्या उभारणीसाठी ब्रिटीश अभियंते आणि अधिकारी यांचा दीर्घकाळ संगमेश्वर येथे मुक्काम होणार होता. या अधिकारी वर्गासह अभियंत्यांच्या निवास आणि भोजनाची उत्तम व्यवस्था व्हावी या करिता निसर्गरम्य परिसरात आणि दोन नद्यांच्या संगमावर हा डाकबंगला माभळे गावाच्या हद्दीत उभारण्यात आला. आता बरोबर ११४ वर्षानंतर या डाकबंगल्यावरुनच मुंबई -गोवा महामार्गाचे चौपदरीकरण होत आहे.
गेली अनेक वर्षे माभळे संगमेश्वर येथील या डाकबंगल्यात तत्कालीन मुकादम म्हणून काम करणाऱ्या शिरी खानविलकर यांनी हा डाकबंगला पाडणं म्हणजे माझं घर पाडल्यासारखं दु:ख आपल्याला होणार असल्याची प्रतिक्रीया व्यक्त केली. २०११ साली या डाकबंगल्याला जेंव्हा १०० वर्षे पूर्ण झाली त्यावेळी सर्वांनी एकत्र येऊन शतक महोत्सव साजरा केला होता. आज या सर्व आठवणी परत एकदा दाटून आल्याचं खानविलकर यांनी डोळ्यात पाणी आणून सांगितलं.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List