जोपर्यंत कर्जमुक्ती नाही तोपर्यंत सरकारला मत नाही, गावागावात बोर्ड लावा; शेतकऱ्यांना आवाहन करत उद्धव ठाकरे यांनी महायुतीला धरले धारेवर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. “दगाबाज रे” पॅकेजचे काय झाले? या शेतकरी संवाद उपक्रमात उद्धव ठाकरे यांनी धाराशिव जिल्ह्यात भूम तालुक्यातील पाथरुडच्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना आवाहन करत राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारला धारेवर धरले. नगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद, महापालिका, लोकसभा असेल, विधानसभा असेल कोणतीही निवडणूक लागू द्या गावात बोर्ड लागले पाहिजेत… कर्जमुक्ती नाही, सरकारला मत नाही. हे जोपर्यंत तुम्ही ठणकावून सरकारला सांगत नाही तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावरती येणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
पीक विम्यासाठी एकरी १२०० रुपये भरावे लागतात. आणि नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना तीन रुपये भरपाई मिळते? सहा रुपये मिळतात? काही वर्षांपूर्वी आपण विमा कंपन्यांवरती मोर्चा काढला होता. कोणाला तीन रुपये, सहा रुपये अशी तुटपुंजी मदत ही शेतकऱ्यांची थट्टा आहे. ज्या-ज्या शेतकऱ्यांची फसवणूक होईल त्यांच्याकडून या पावत्या घ्या. सहा रुपये मिळाले, पाच रुपये मिळाले आणि नुकसान भरपाई किती मिळायला पाहिजे होते? त्याच्यानंतर तुम्ही विमा कोणत्या कंपनीचा घेतला? कोणत्या योजनेची तुम्ही नोंदणी केली? त्याची माहिती कार्यकर्त्यांनी घ्यावी. आणि विमा कंपन्यांनी येत्या महिन्या पंधरा दिवसांत शेतकऱ्यांची पूर्ण नुकसान भरपाई द्या. नाहीतर सगळे शेतकरी तुमच्या ऑफिसवर येऊन धडकतील. शहरात ऑफिस असेल तर आम्ही शेतकऱ्यांना घेऊन येऊ, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.नाव काय तर प्रधानमंत्री फसल विमा योजना… फसल म्हणजे फसलात तुम्ही, नावातच फसवलेलं आहे, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.
मुख्यमंत्री बोलले होते दिवाळीच्या आत शेतकऱ्यांना पैसे देणार, आता मुख्यमंत्री कुठे आहेत? बिहारमध्ये आणि शेतकरी इकडे उघड्यावरती पडला आहे. आणि मुख्यमंत्री आमचे बिहारला आहेत. मुख्यमंत्री तिथल्या जाहीर सभेत सांगताहेत की पंतप्रधानांचं सगळ्या राज्यांवरती प्रेम आहे. लेकीन अंदर की बाब ये है की बिहारवरती पंतप्रधानांचं सगळ्यात जास्त प्रेम आहे. मग असे राज्यकर्ते तुम्हाला आम्हाला न्याय देतील? तुमचं नुकसान जे झालेलं आहे वेळेवरती धावून येतील? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
आता आपल्या राज्याला विरोधी पक्षनेता नाहीये, का? तर म्हणे संविधानात अशी तरतूद नाहीये. मग संविधानात नसलेले उपमुख्यमंत्री सुद्धा नाहीयेत. म्हणजेच कोण आहे एक अनर्थमंत्री, एक नगरभकास मंत्री आणि तिसरे गृहकलह मंत्री… घराघरात भांडणं लावणारे आहेत. आपली मागणी आहे ती मी सोडणार नाही. फक्त तुम्ही साथ देणार आहात की नाही? तेवढचं सांगायचं. माझी मागणी नाहीये, मी शेतकऱ्यासाठी लढतोय. हेक्टरी ५० हजार रुपये मिळालेच पाहिजे. जूनमधली कर्जमाफी तुम्हाला मान्य आहे का? जूनपर्यंतचे हप्ते भरायचे की नाही भरायचे? खरीप गेला आता रब्बीचा हंगाम येणार. त्यासाठी कर्ज लागणार, आधी डोक्यावरचं कर्ज फेडलत सगळ्यांनी? अजित पवार म्हणतात, तुम्हाला सगळचं कसं फुकट द्यायचं? हातपाय हलवा जरा. माझा शेतकरी हातपाय हलवतोय, तुम्ही सुद्धा हात हलवा आणि कर्जमाफीवरती सही करा, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
शेतकरी म्हणून एकवटा, तुमची वज्रमूठ दाखवा आणि हे सरकार… उद्धव ठाकरे यांचे शेतकऱ्यांना आवाहन
केंद्राचं पथक रात्री टॉर्च घेऊन फिरतंय, नुकसान कुठे झालं बघायला. दोन-तीन दिवसांचा केंद्रीय पथकाचा दौरा आहे. दोन-तीन दिवसांत काय कळणार? आणि इतक्या दिवसांनी? गावोगावी बोर्ड लावा. केंद्राचं पथक दाखवा आणि १०० रुपये मिळवा. ही कोणती पद्धत आहे, हे कोणतं सरकार आहे? की जी इतिहासातील सगळ्यात मोठ्या पॅकेजची घोषणा आपल्या मुख्यमंत्र्यांनी केली त्या मुख्यमंत्र्यांना सांगायला आलोय की हे तुमचं सगळं थोतांड आहे ते बंद करा. शेतकऱ्याला उठवू नका, पेटवू नका, त्याला चेतवू नका. कारण तो जर का एकदा उसळला तर मग तुमचं सिंहासन जाळून खाक केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
मदत जाहीर किती झालीय? आणि दर एकरी आणि हेक्टरी प्रत्यक्षात किती पैसे मिळाले, याची यादीच इथल्या ताईंनी दिली. तसंच पिक विम्याचे पैसे किती भरले? अपेक्षित नुकसान भरपाई किती होती? मिळालेत की नाही? मिळाले तर किती मिळाले? ज्यांची जनावरं वाहून गेली त्यांना जनावरं परत मिळाली का? कोंबड्या गेल्या कोंबड्या मिळाल्यात का? जमीन खरवडून गेली माती मिळाली का? विम्याचे पैसे मिळाले का? नाही. सगळचं नाही असेल तर मग या दगाबज सरकारशी तुम्हाला दगाबाजी करावीच लागेल, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. शेतकऱ्यांना कर्जमाफी नको. मात्र, हमीभाव द्या असे शेतकरी म्हणतात. शेतकरी स्वाभिमानी आहे त्याला राज्य सरकारची भीख नको. शेतकरी हक्क मागतोय, असे उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारला सुनावले.
आता निवडणुका आल्यानंतर आम्ही कर्जमाफी करणार आहोत पण कधी जूनमध्ये तोपर्यंत तुमची मतं आम्हाला पाहिजेत. आणि अझित पवार काय म्हणाले, आम्हाला जिंकायचं होतं म्हणून आम्ही कर्जमाफी करू असं बोलले. मग आता तुम्ही सांगायचं, आधी कर्जमाफी करा मग आम्ही तुम्हाला मत देऊ. कर्जमाफी नाही तर मत नाही. हे गावागावात बोर्ड लावा. नगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद, महापालिका, लोकसभा असेल, विधानसभा असेल कोणतीही निवडणूक लागू द्या गावात बोर्ड लागले पाहिजेत कर्जमुक्ती नाही, सरकारला मत नाही. हे जोपर्यंत तुम्ही ठणकावून सरकारला सांगत नाही तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावरती येणार नाही. जोपर्यंत कर्जमुक्ती नाही तोपर्यंत सरकारला मत नाही. जोपर्यंत पीक विम्याचे पैसे मिळत नाही तोपर्यंत सरकारला मत नाही. हेक्टरी ५० हजार रुपये मिळत नाही तोपर्यंत सरकारला मत नाही. झाला निश्चिय, शिवसेना तुमच्या सोबत आहे. काळजी करू नका, असा विश्वास यावेळी उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List