सत्याच्या मोर्चाची तयारी जोरात, सर्वपक्षीय नेत्यांची पोलीस आयुक्तांशी चर्चा
बोगस मतदान आणि मतदार याद्यांमधील घोळांबाबत पुरावे दिल्यानंतरही ठोस पावले न उचलणाऱया निवडणूक आयोगाचा निषेध करण्यासाठी 1 नोव्हेंबरला मुंबईत सत्याचा सर्वपक्षीय विराट महामोर्चा काढला जाणार आहे. त्यासंदर्भात सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळाने आज पोलीस आयुक्त देवेन भारती यांची भेट घेऊन चर्चा केली. पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिली असून संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती या भेटीनंतर देण्यात आली.
या भेटीनंतर शिष्टमंडळाने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. बोगस मतदान रोखण्यासाठी निवडणूक आयोगाकडून काहीच पावले उचलली जात नसल्याचा निषेध नोंदवण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे, असे सांगतानाच खासदार अरविंद सावंत यांनी मोर्चासाठी लोकांनी कसे पोहोचावे याबाबत यावेळी माहिती दिली. मोर्चासाठी पूर्व उपनगरातून लोकल, बसेसने येणाऱया लोकांनी छत्रपती शिवाजी टर्मिनसमार्गे फॅशन स्ट्रीट येथे जमायचे. पश्चिम उपनगरातून मेट्रो किंवा बसने येतील त्यांनी इन्कम टॅक्स इमारतीसमोर उतरून तिथून आतल्या गल्लीत चालत मुंबई रुग्णालयाकडून फॅशन स्ट्रीटला यायचे आहे, असे त्यांनी सांगितले.
दुपारी 2 वाजता मोर्चाला सुरुवात
मोर्चासाठी 1 नोव्हेंबरला दुपारी ठीक 1 वाजेपर्यंत सर्वांनी फॅशन स्ट्रीट येथे जमायचे आहे. 2 च्या सुमारास मोर्चाला सुरुवात होईल. मोर्चाची सांगता मुंबई महानगरपालिका मुख्यालयासमोर प्रमुख नेत्यांच्या भाषणांनी होईल, असे खासदार सावंत यांनी सांगितले. कामावरून सुटणाऱया मुंबईकरांना त्रास होऊ नये म्हणून मोर्चा सायंकाळी 4 वाजेपर्यंत संपवण्यात येणार आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.
मोर्चा मार्ग व पार्किंग व्यवस्थेसाठी क्यूआर कोड
मोर्चाचा मार्ग आणि गाडय़ांच्या पार्किंग व्यवस्थेबाबत लोकांना माहिती मिळावी यासाठी एक क्यूआर कोड देण्यात येणार आहे. तो स्पॅन केल्यानंतर सर्व माहिती त्यांना मिळेल.
हजारो धारावीकर मोर्चात सहभागी होणार
1 नोव्हेंबरच्या सर्वपक्षीय मोर्चात सहभागी होण्याचा निर्णय ‘धारावी बचाव’ आंदोलनाने घेतला आहे. धारावीतील हजारो नागरिक या मोर्चात सहभागी होणार आहेत. राज्य सरकारने धारावीची शेकडो एकर जागा उद्योगपती अदानींना आंदण दिली. धारावीकरांना तेथून बेदखल करून त्यांचे इतरत्र पुनर्वसन करण्याच्या सरकारच्या हालचाली सुरू आहेत. त्यासाठी धारावीमध्ये अदानींकडून सर्वेक्षणही करण्यात येत आहे. मात्र धारावीकर आपली जागा सोडून कुठेही जाण्यास तयार नाहीत. धारावीकरांना धारावीतच 500 चौरस फुटांचे घर मिळावे यासाठी ‘धारावी बचाव’ आंदोलनाकडून सातत्याने आवाज उठवला जात आहे. तरीही सरकारकडून त्याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे हे सरकारच बदलले पाहिजे, असे मत आंदोलनाच्या नेत्यांकडून व्यक्त केले जात आहे. त्यासाठीच 1 नोव्हेंबरच्या मोर्चात पूर्ण ताकदीनिशी सहभागी होण्याचा निर्णय धारावीकरांनी घेतला असल्याचे आंदोलनाचे नेते, माजी आमदार बाबुराव माने यांनी सांगितले.
- पोलीस आयुक्त कार्यालयात मंगळवारी सकाळी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेऊन मोर्चाच्या नियोजनाबाबत माहिती दिली. या शिष्टमंडळात शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, आमदार अनिल परब, शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे, काँग्रेसचे नेते सचिन सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड, मुंबई अध्यक्षा राखी जाधव, मनसेचे नेते बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर, कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड प्रकाश रेड्डी, विभागप्रमुख संतोष शिंदे यांचा समावेश होता.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List