रिल्ससाठी बाईकवर करत होता स्टंट, नंतर असे काही घडले आणि जीवावर बेतले
रिल्स बनविण्याचा ट्रेण्ड जीवघेणा ठरत आहे. काहीतरी हटके करण्यासाठी तरुणाई जीवघेणे स्टंट करत आहे. अशातच हिमाचल प्रदेशमधील एका 22 वर्षीय तरुणाने बाईकवर स्टंट करताना आपला जीव गमावला आहे. ही घटना हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील आहे.
अनिकेत असे त्या मृत मुलाचे नाव असून तो नागचला येथील रहिवासी होता. तो कायम सोशल मीडियावर सक्रिय असून तो त्याचे बाईकवरचे वेगवेगळे स्टंट शेअर करत असायचा. शनिवारी मध्यरात्री 1च्या सुमारास अनिकेत बाइकवरुन स्टंट करत होता आणि त्याचे मित्र त्याचा व्हिडीओ बनवत होते. दरम्यान अनिकेतचे बाईकवरील नियंत्रण सुटले आणि बाइकचा अपघात झाला. अपघातात त्याच्या मानेला गंभीर दुखापत झाली. ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच टूरिस्ट अॅण्ड ट्रॅफिक पोलीस स्टेशन नागचलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि घटनेचा आढावा घेतला. पोलिसांमी मृतदेह ताब्यात घेतला असून मेडिकल कॉलेज नेरटौक येथे शवविच्छेदनसाठी पाठवण्यात आला आहे.
या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर चंद्र यांनी सांगितले की, अनिकेतसोबत स्टंट व्हिडीओ बनविणारे मित्र, रायडर्स आणि व्हिडीओ ग्राफरवर आरोपपत्र दाखल केले आहे. त्यांची नावे एफआयआरमध्ये आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून मोबाईल फोन आणि कॅमेरा फुटेज देखील जप्त केले आहेत. संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. घटनास्थळावरील व्हिडिओ फुटेजमध्ये अनिकेतचे स्टंट करताना नियंत्रण सुटले आणि त्यामुळे हा अपघात झाला हे स्पष्ट दिसत आहे. मंडी पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List