रोखठोक – शिंदे यांचे `भाऊबंदकी’ नाट्य, महाराष्ट्राचे आधुनिक राघोबादादा!
भाजप आणि शिंदे सेनेत भाऊबंदकी सुरू झाली आहे. ती थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रात रंगलेल्या ‘भाऊबंदकी’ नाट्यावर शिंदे यांनी भाष्य केले. ऐतिहासिक ‘भाऊबंदकी’ नाटकातला खलनायक राघोबादादा होता. शिंदे व राघोबादादात कमालीचे साम्य आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणातली भाऊबंदकी संपून मनोमीलनाचे प्रयोग सुरू झाले व या मनोमीलनास तुफान प्रतिसाद मिळत आहे. हे मनोमीलन एकनाथ शिंदे वगैरे अमित शहांच्या हस्तकांना पटलेले दिसत नाही. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी अंबरनाथ येथील एका कार्पामात लिहून आणलेले भाषण वाचून दाखवले. त्यात ते म्हणाले, “पूर्वी ‘भाऊबंदकी’ नाटक गाजले होते. आता मात्र राज्यात ‘मनोमीलन’ नाटक सुरू आहे.” शिंदे यांचे हे विधान म्हणजे राज्यात सुरू असलेल्या मराठी एकजुटीविरुद्धची मळमळ आहे. भाऊबंदकी आणि आपापसांतील वैराने मराठेशाहीचा घात झाला. पेशव्यांनी मराठा साम्राज्य भारताच्या सीमा ओलांडून अटकेपार नेले, ते मराठ्यांतील साठमारीने नष्ट झाले. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व आले ते शिंदे वगैरे लोकांच्याच कलह व बेइमानीमुळे नष्ट झाले. त्यामुळे शिंदे यांना महाराष्ट्रातील भाऊबंदकी कायम राहावी व त्या दुहीतून स्वार्थ साधावा असे वाटत असेल तर ते समजण्यासारखे आहे. त्यामुळे ‘भाऊबंदकी’ हवी, ‘मनोमीलन’ नको, ही त्यांची भूमिका ते मांडत आहेत. संयुक्त महाराष्ट्र लढ्यात `सूर्य-चंद्र असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही,’ अशी भूमिका त्या वेळचे ज्येष्ठ काँग्रेस नेते स. का. पाटील घेत होते. ते सदोबा आणि हा मिंधोबा म्हणजे एकाच माळेचे मणी.
राघोबाचे जिवंत पात्र
ज्या ‘भाऊबंदकी’ नाटकाचा उल्लेख शिंदे करतात, त्या नाटकाविषयी त्यांना कितपत माहिती आहे? कुणीतरी लिहून दिलेली भाषणे वाचायची व ‘मीडिया’त पैसे वाटून त्यावर प्रसिद्धी घ्यायची हे या लोकांचे धोरण. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर या क्रांतिकारक नाटककाराने हे नाटक 1909 साली लिहिले. पेशवेकाळातील भाऊबंदकी आणि सत्तासंघर्षावर आधारित हे नाटक आहे. त्यात राजकीय उलथापालथ, कट-कारस्थाने आणि पाठीत खंजीर खुपसण्याचे प्रसंग असल्याने या नाटकाने शिंदे यांना आकर्षित केले. ‘भाऊबंदकी’ नाटकाच्या पहिल्या अंकात नारायणरावांच्या खुनाची महत्त्वाची घटना पार पडते, तरीही पुढच्या तिन्ही अंकांत नाटक खिळवून ठेवते ते त्यातील पात्र योजनेमुळे. शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत जे केले ते स्वराज्याच्या शत्रूंशी म्हणजे अमित शहांशी जी हातमिळवणी केली ते सर्व प्रकार खाडिलकरांच्या ‘भाऊबंदकी’त आहेत. शिंदे हे ‘भाऊबंदकी’तले खलनायक आहेत. अति महत्त्वाकांक्षी, लोभी, लाचार ही राघोबाची सर्व विशेषणे त्यांना चपखल बसतात. नारायणरावांचा खून हे सत्तेसाठी केलेले षड्यंत्र होते. त्यात राघोबाचा हात होता. भाऊबंदकीचे सूत्रधार म्हणून राघोबाचा उल्लेख होतो व शिंदे हे नव्या राजकारणातले ‘राघोबा’ आहेत. दुसरे असे की, महाराष्ट्रात घराघरांत भांडणे लावण्याचे व घरे फोडण्याचे काम भारतीय जनता पक्षाने सुरू केले. राज्यभरात भाऊबंदकीचा धुमाकूळ घालून राज्य करायचे हे भाजपचे सूत्र आहे. त्या सूत्रात एकनाथ शिंदे यांनाही घेतले. त्यामुळे भाऊबंदकी हे महाराष्ट्रातील घराघरांतले दुखणे झाले. शिंदे यांना ‘भाऊबंदकी’ नाटकाची आठवण झाली, पण ज्या नव हिंदुत्ववाद्यांचे हस्तक म्हणून ते वावरत आहेत त्या हिंदूंमध्ये महाभारत काळापासून भाऊबंदकी आणि कलह आहेत. ‘श्यामची आई’मध्ये साने गुरुजी सांगतात, “या भारतवर्षात भाऊबंदकी फार! कौरव-पांडवांच्या वेळेपासून आहे, ती अजून आहे. भावाभावांत जेथे प्रेम नाही तेथे स्वतंत्रता कशी नांदेल? मोक्ष कसा राहील?” हे सत्य आहे. ज्यांच्या पालखीचे भोई आज शिंदे वगैरे लोक आहेत तेथे पैसा, स्वार्थ व कपट याशिवाय दुसरे काहीच नाही. भाजपमध्ये मोदी कालखंड सुरू झाल्यावर पित्यासमान लालकृष्ण आडवाणी यांना 12 वर्षांपासून जवळजवळ ‘हाऊस आरेस्ट’ म्हणजे बंदिवान करून ठेवले गेले व उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे नक्की काय झाले ते आजही कळत नाही. हे सर्व स्वार्थ, कलह, महत्त्वाकांक्षेतून घडले. शिंदे यांना आठवलेल्या ‘भाऊबंदकी’चे हे नाट्य प्रवेश आहेत.
धर्मराज आणि दुर्योधन
भाजपमध्ये एकेकाळी ‘धर्मराज’ होते, आज दुर्योधन वाढले, असे जुनेजाणते हिंदुत्ववादी बोलताना दिसतात. त्यात शिंदेंसारख्या भाजपच्या उपवस्त्रांनी संघाच्या नेतृत्वालाही भ्रष्ट केले, हे उघडपणे बोलले जाते. त्यामुळे महाराष्ट्रावर सुरू असलेले भ्रष्टाचाराचे राज्य नागपूरपासून मुंबईपर्यंत उघड्या डोळ्यांनी सहन केले जात आहे. सत्यपाल मलिक आता नाहीत. ते जम्मू-कश्मीरचे राज्यपाल असताना एका ऊर्जा प्रकल्पाच्या मंजुरीसाठी संघाचे राम माधव यांनी राज्यपाल मलिकांवर दबाव आणला व संघाच्या नेत्यांनी या कामासाठी मलिक यांना 300 कोटी रुपयांची ‘लाच’ आाफर केली. महाराष्ट्रात व इतर राज्यांत अशी मोठी कामे करून घेण्यासाठी आता संघाचे प्रमुख लोक मध्यस्थांची भूमिका बजावतात व शिंदे यांच्यासारखे लोक संघाला त्यांच्या भ्रष्टाचारात सामील करून घेतात. या कामी शिंदे यांची फडणवीसांशी भाऊबंदकी व संघाशी मनोमीलन झालेच आहे.
दोन बंधू एकत्र
शिंदे यांच्या पोटात भीतीचा गोळा आला व सारखे पोटात दुखतेय ते उद्धव व राज ठाकरे हे एकत्र आल्यामुळे. दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे शिंदे यांची अवस्था बिकट झाली. ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे महाराष्ट्रात मराठी एकजूट भक्कम झाली. त्यामुळे भाजपास प्रिय असलेले `दुही’चे नाट्य महाराष्ट्रात तरी संपले. ‘फोडा, झोडा, राज्य करा’ या ब्रिटिश नीतीचा अवलंब भाजपने सतत केला. ठाकरे एक झाल्यामुळे या नीतीला तडे गेले. एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांनी भावासारखे सांभाळले व राजकारणात मोठे केले. त्या शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचा स्वार्थासाठी घात केला. ही भाऊबंदकीच आहे. राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी वेगळे राहणे हे महाराष्ट्राला परवडणार नाही. दोन बंधूंनी एकत्र यावे यासाठी ‘मातोश्री’ची परवानगी न घेता एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक व राजन विचारे हे 10-12 वर्षांपूर्वी श्री. राज ठाकरे यांना भेटायला त्यांच्या निवासस्थानी गेले होते. त्यातील शिंदे, सरनाईक आता अमित शहांच्या तंबूत सामील झाले व विचारे उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच आहेत. त्याआधी शिंदे व सरनाईक यांच्याबरोबरच्या वैयक्तिक भेटीत मला अनेकदा सांगितले की, “उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येतील, असे काहीतरी करा. महाराष्ट्रावर भगवा फडकवण्यासाठी हे आवश्यक आहे. भाजपला रोखायचे असेल तर दोन भावांनी एकत्र यावे.” त्यांचे म्हणणे तेव्हा खरेच होते, पण आता दोन बंधू एकत्र आले तर शिंदे यांच्या पोटात कळा सुरू झाल्या. पुरुषांत बाळंत व्हायची व्यवस्था असती तर त्यांच्या पोटातून भाऊबंदकीचा गोळाच निघाला असता!
सध्या भाजप आणि शिंदे हे भाऊ भाऊ असल्याचे चित्र उभे केले जाते ते झूठ आहे. शिंदे हे फडणवीस यांना संपवायला निघाले आहेत आणि फडणवीस यांना शिंदे व त्यांचे लोक आसपास नको आहेत. या नव्या भाऊबंदकीच्या ठिणग्या महाराष्ट्रात रोज पडत आहेत. एक उदाहरण देतो व हा भाऊबंदकीचा अंक संपवतो. ठाण्यात एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक यांच्यात भाऊबंदकीच्या मारामाऱ्या रोज सुरू आहेत. ठाण्याच्या पोखरण येथे एका ‘ऑक्सिजन पार्क’चे उद्घाटन भाजप आमदार केळकर यांनी उपमुख्यमंत्री, ठाण्याचे पालकमंत्री शिंदे येण्याआधीच उरकून टाकले व निघून गेले. हा भाऊबंदकीचा खणखणाट राज्यात रोज सुरू आहे. त्यांच्यात मनोमीलन होणे शक्य नाही. तेव्हा शिंदे हे ‘भाऊबंदकी’ नाट्यात स्वत:च अडकून पडले आहेत.
Twitter – @rautsanjay61
Gmail- [email protected]
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List