आरबीएल बँक दुबईच्या ‘एमिरातस् एनबीडी’च्या ताब्यात
पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठी म्हणून ओळखली जाणारी आरबीएल बँक (रत्नाकर बँक लिमिटेड) आता दुबईच्या एमिरातस् एनबीडी बँकेने ताब्यात घेतली आहे. बँकेचे 90 कोटी 80 लाख शेअर्स प्रत्येकी 280 रुपयांनी म्हणजे 26853 कोटी रुपयांचे 60 टक्के शेअर्स एमिरातस् बँकेने घेतले आहेत. चारच दिवसांपूर्वी सर्व सोपस्कर पूर्ण करण्यात आले. या महत्त्वपूर्ण प्राथमिक भागभांडवल विक्रीला नियामक फाईलिंगद्वारे नुकतीच मंजुरी दिली आहे. या निर्णयाचा सर्वांत मोठा परिणाम भागधारकांवर होणार आहे. या निर्णयाने शेअर्सचे भाव सहा टक्क्याने वाढले आहेत.
आरबीएल बँकेचे 10 रुपये किंमत असणारे शेअर्स एकेकाळी 850 वर गेले होते; परंतु सध्या त्याची पातळी 320 च्या आसपास आहे. मिरज तालुक्यातील समडोळी या छोटय़ा गावातून 1943 साली स्थापन झालेली रत्नाकर बँक आजच्या घडीला दुबईच्या एमिरातस् एनबीडी बँकेच्या मालकीखाली गेली आहे.
आता दुबईच्या एमिरातस् एनबीडी या बँकिंग संस्थेने आरबीएल बँकेत तब्बल 26 हजार 823 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. या करारानुसार 95 कोटी 90 लाख शेअर्स म्हणजेच 60 टक्के मालकी दुबईच्या एनबीडी बँकेकडे जाणार आहे. हा व्यवहार हिंदुस्थानातील सर्वांत मोठा परदेशी बँकिंग करार ठरला आहे. हा व्यवहार बाजारातील नियमानुसार एमिरातस् एनबीडीला आरबीएल बँकेच्या भागधारकांसाठी देखील बंधनकारक ठरणार आहे. दरम्यान एमिरातस् बँक आरबीएल बँकेच्या सध्याच्या व्यवस्थापनात कोणताही बदल करणार नाही. बँकेचे बहुतांश व्यवस्थापन सदस्य यांच्या भूमिकांमध्ये कायम राहतील आणि नव्या मालकाच्या इनपूटसह बँकेचे धोरणात्मक निर्णय घेतले जातील.
‘रत्नाकर’चा जन्म समडोळीच्या मातीतून
सन 1943 साली हिंदुस्थान स्वातंत्र्याच्या स्वप्नांनी झगडत होता आणि त्याच काळात समडोळीतील दूरदृष्टी असलेले, प्रखर बुद्धिमान बाबगोंडा भुजगोंडा पाटील यांनी ‘रत्नाकर बँक लिमिटेड’ या बँकेची स्थापना केली. समडोळीची रत्नाकर बँक पुढे पश्चिम महाराष्ट्राच्या अर्थजगतात एक विश्वासार्ह नाव ठरली. 14 जून 1943 रोजी रत्नाकर बँकेस अधिकृत मान्यता मिळाली. सुरुवातीची तेरा वर्षे बाबगोंडा पाटील स्वतः अध्यक्षपदावर राहिले. 1969 मध्ये बँकेला ‘शेडय़ुल्ड बँक’चा दर्जा मिळाला, 1970 मध्ये बँकिंग परवाना मिळाला.
या कराराने समडोळीच्या भावनांवर जणू शिक्कामोर्तब
ज्यांनी आपल्या गावातील छोटय़ा दालनातून ही बँक उभी केली, त्यांचे नाव आता केवळ ‘इतिहासाच्या फाईलमध्ये’ उरले आहे. ‘रत्नाकर’चा आत्मा हरवला; पण आठवणी अमर समडोळीच्या मातीचा हा रत्नाकर आता दुबईच्या वाळवंटात झळकतोय. गावकऱयांना अभिमान आणि वेदना जाणवणारी ही वेळ आहे. बाबगोंडा पाटीलांनी रुजवलेले बी आज विशाल वृक्ष बनले; पण त्या वृक्षाची मुळे आता परकीय जमिनीत रोवली गेली आहेत. 1943 साली जन्मलेली बँक आज 2025 मध्ये एमिरातस् एनबीडी बँकेच्या ताब्यात गेली आहे. बाबगोंडा पाटील, समडोळी आणि रत्नाकर ही तीन नावे इतिहासात कायम कोरली जातील; पण त्या नावांचा स्वामित्वाचा हक्क मात्र आता आपल्या हाती राहिला नाही. रत्नाकर बँकेचे रुपांतर जागतिक बँकेत झाले; पण तिच्या पायवाटा मात्र अजूनही समडोळीच्या मातीतूनच सुगंध देतात!
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List