satara News – राज्यातील कायदा-सुव्यवस्था ढासळली; गृहखाते फेल
आपल्या मागे कोणाचा तरी कृपाशीर्वाद आहे, ही भावना आल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून राज्यातील कायदा-सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे, गृहखाते फेल गेले आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी सरकारवर निशाणा साधला. राजकारणासाठी जेव्हा पोलीसबळाचा वापर केला जातो, तेव्हा गुन्हेगारांचे धाडस वाढते आणि हे धाडस वाढल्यामुळेच डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येसारख्या घटना घडत आहेत, असा थेट आरोप त्यांनी केला.
सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुख्यमंत्री कणखरपणे काम करतील, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. मात्र, प्रशासनातील हस्तक्षेप या सर्व गोष्टींना कारणीभूत असल्याची टीका त्यांनी केली. जिथे न्याय आणि सुरक्षा मागायची, तिथे पोलीस अधिकारीच अशा प्रकरणात गुंतले असतील, तर तिथे कोणाकडून अपेक्षा करायची? असा सवाल शिंदे यांनी केला.
राजकीय दबावाखाली काम करावे लागते, तेव्हा बीड जिल्ह्यातून गरीब कुटुंबातून शिकून डॉक्टर झालेल्या या तरुणीला आत्महत्येसारखे पाऊल उचलावे लागते. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून जे जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी आमदार शिंदे यांनी याप्रसंगी केली. डॉक्टर तरुणीने डीवायएसपींकडे, सिव्हील सर्जनकडे तक्रार केली होती. त्याकडे दुर्लक्ष केले गेल्यामुळे तरुणीचा नाहक बळी गेला. त्या पीडित तरुणीने तक्रार केली, त्या वेळीच डीवायएसपींनी त्यामध्ये लक्ष घालायला हवे होते. त्यांनी का घातले नाही? असा जळजळीत सवाल आमदार शिंदे यांनी केला.
अशा प्रवृत्तींना आवरा; अन्यथा…
माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावरील वैयक्तिक टीका तसेच जत येथील राजारामबापू कारखान्याचे नाव बदलण्याच्या प्रकाराविषयी शिंदे म्हणाले, आपल्या बापाचेच राज्य आहे, अशी भावना ज्यावेळी होते, त्यावेळी कायदा बाजूला ठेवून काहीही करायचे धाडस वाढते. मुख्यमंत्र्यांनी अशा प्रवृत्तींना आवरावे, अन्यथा रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही दिला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List