साखर आयुक्तांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना वजनकाट्यांच्या तपासणीसाठी भरारी पथके
राज्यातील साखर कारखान्यांचा ऊसगाळप हंगाम 1 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. साखर कारखान्यांचे वजनकाटे तपासणीकरिता शेतकरी संघटनांकडून सतत मागणी होत आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयस्तरावरून भरारी पथकांची स्थापना करून त्यांच्यामार्फत ऊस वजनकाट्यांची तपासणी करण्याची कार्यवाही करावी, अशा महत्त्वपूर्ण सूचना साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
ऊसगाळप हंगामाच्या पाश्र्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यरत साखर कारखान्यांच्या प्रमाणात तालुकानिहाय अथवा जिल्हास्तरावर भरारी पथकाची स्थापना करावी. भरारी पथकांमध्ये महसूल, पोलीस, वैद्यमापन शाखा विभाग, प्रादेशिक साखर सहसंचालक व शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींची नियुक्ती करावी. कार्यरत साखर कारखान्यांच्या प्रमाणात तालुकानिहाय गरजेनुसार भरारी पथक स्थापन केल्यास तालुकास्तरीय संबंधित विभागाचे अधिकारी भरारी पथकातील सदस्य राहतील.
जिल्ह्यातील भरारी पथकांनी स्वयंस्फूर्तीने कारखानास्थळावर अचानक भेटी देऊन वजनकाट्याची तपासणी करावी. गैरप्रकार आढळल्यास यंत्रणेमार्फत योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना भरारी पथकांना साखर आयुक्तांनी दिल्या आहेत.
राज्यामध्ये शासनाचे वजनकाटे तपासणी यंत्रे धूळखात पडलेली आहेत. त्यावरील धूळ प्रथम संबंधित विभागांनी झटकून ती वापरात आणावीत. नाहीतर विनावापर धूळखात पडलेली सर्व यंत्रे हुडकून आम्हालाच भंगारात द्यावी लागतील. शासन कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर सर्वत्र करू पाहत आहे. त्यामुळे उसातील काटामारी रोखण्यासाठी एआय तंत्रज्ञान वापरून सर्व यंत्रणा ऑनलाइन करून पारदर्शकता आणावी.
– राजू शेट्टी, अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना.
साखर कारखान्यांच्या वजनकाट्याच्या तपासणीमध्ये काही गैर कायदेशीर बाबी आढळल्यास सर्व संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी. ऊस वजनकाटा कॅलिब्रेशनमध्ये फेरफार करून ऊस वजन काटामारी केली जाते, अशा तक्रारी प्राप्त होत आहेत. यासाठी ऊस वजनकाटा कॅलिब्रेशन करून सील करावे. संबंधित वैधमापन अधिकाऱ्याने वजनकाट्याची तपासणी करतेवेळी शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींना सोबत घेऊन ऊस वजन काटे कॅलिब्रेशन झाल्यानंतर सील करावेत.
डॉ. संजय कोलते, साखर आयुक्त.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List