Jammu Kashmir – राज्यसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सचा बोलबाला, तीन जागांवर विजय; भाजपला एक जागा
जम्मू आणि कश्मीरमधील राज्यसभा निवडणुकीचे निकाल आज (शुक्रवारी) जाहीर झाले असून या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सचाच बोलबाला पहायला मिळाला. यात नॅशनल कॉन्फरन्सने चारपैकी तीन जागांवर विजय मिळवला आणि एका जागी भाजपने विजय मिळवला. भाजपकडून सतपाल शर्मा विजयी झाले. नॅशनल कॉन्फरन्सचे चौधरी मोहम्मद रमजान, जी.एस. ओबेरॉय उर्फ शम्मी ओबेरॉय आणि सज्जाद किचलू विजयी झाले. राज्यसभेच्या निवडणुकीत चार क्रॉस-व्होटिंग झाले.
जम्मू-कश्मीरमध्ये कलम 370 रद्द केल्यानंतर आणि राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन झाल्यानंतरची ही पहिली राज्यसभा निवडणूक आहे. या निवडणुकीत चौधरी मोहम्मद रमजान यांची भाजपच्या अली मोहम्मद मीर यांच्याशी थेट लढत होती. सज्जाद किचलू यांचा सामना भाजपच्या राकेश महाजन यांच्याशी झाला. सज्जाद यांना 57 मते मिळाली. शम्मी ओबेरॉय हे राज्यसभेवर निवडून येणारे जम्मू आणि काश्मीरमधील पहिले शीख नेते असतील.
जम्मू आणि काश्मीरमधील राज्यसभेच्या निवडणुका तीन अधिसूचनांमध्ये विभागल्या आहेत. निवडणूक आयोगाने जम्मू आणि काश्मीरमधील चार राज्यसभेच्या जागांसाठी तीन अधिसूचना जारी केल्या. यापैकी दोन जागांसाठी स्वतंत्रपणे निवडणुका घेण्यात आल्या, तर इतर दोन जागांसाठी एकाच अधिसूचनेनुसार निवडणुका घेण्यात आल्या.
नॅशनल कॉन्फरन्सने पक्षाचे कोषाध्यक्ष जी.एस. ओबेरॉय आणि त्यांचे तरुण राज्य प्रवक्ते इम्रान नबी दार यांना भाजपच्या सतपाल शर्मा यांच्या विरोधात उमेदवारी दिली. जी.एस. ओबेरॉय यांना शम्मी ओबेरॉय म्हणूनही ओळखले जाते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List