माझ्यावर चार वेळा लैंगिक अत्याचार, मानसिक छळ; पेनाने हातावर लिहित फलटणमध्ये महिला डॉक्टरनं घेतला गळफास
सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. डॉ. संपदा मुंडे असे आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी महिला डॉक्टरने हातावर पेनाने सुसाईड नोट लिहून ठेवली असून यात तिने पोलीस उपनिरीक्षकासह अन्य एकावर गंभीर आरोप केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. संपदा मुंडे यांनी गुरुवारी रात्री टोकाचे पाऊल उचलत फलटण येथील लॉजमध्ये गळफास घेत जीवन संपवले. आत्महत्या करण्यापूर्वी महिला डॉक्टरने पेनाने हातावर सुसाईट नोट लिहिली आहे. पोलीस निरीक्षक गोपाल बदने याने माझ्यावर चार वेळा बलात्कार केला, तर अन्य एकाने शारिरक व मानसिक त्रास दिला, असे या सुसाईड नोटमध्ये महिला डॉक्टरने लिहिले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून पोलीस उपनिरीक्षक बदने यांना या प्रकरणात निलंबित करण्याचे वृत्त माध्यमांनी दिले आहे.
डॉ. मुंडे या गेल्या काही महिन्यांपासून पोलीस आणि आरोग्य विभागातील वादात अडकल्या होत्या. एका वैद्यकीय तपासणीच्या प्रकरणात पोलिसांशी त्यांचा वाद झाला होता, त्यानंतर त्यांच्यावर अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली होती. चौकशीदरम्यान त्यांनी आपल्या वरिष्ठांना लेखी स्वरूपात तक्रार देत म्हटले होते की, “माझ्यावर अन्याय होत आहे. मी आत्महत्या करीन.” तथापि, त्यांच्या या तक्रारीकडे दुर्लक्ष झाल्याचे सहकाऱ्याकडून कळते. अखेर गुरुवारी रात्री डॉ. संपदा मुंडे यांनी टोकाचे पाऊल उचलत फलटण येथील लॉजमध्ये गळफास घेतला.
डॉ. संपदा मुंडे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या हातावर सुसाई नोट लिहीली असून यामध्ये फलटण येथील पोलीस उपनिरिक्षक आणि एकामुळे आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर विरोधकही आक्रमक झाले असून संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही याबाबत एक ट्विट केले आहे.
फलटण, जि. सातारा येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत महिला डॉक्टरचे आत्महत्या प्रकरण अतिशय गंभीर आहे. या महिलेने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये तिने गेली काही दिवसांपासून तिचा शारिरीक आणि मानसिक छळ होत असल्याचे वरीष्ठांना वारंवार कळविले होते. परंतु तिच्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही. अखेर तिने टोकाचे पाऊल उचलले. या विषयाच्या मूळाशी नेमके कोणते कारण आहे? या महिलेच्या तक्रारीची दखल का घेतली गेली नाही? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजेत. संबंधित महिलेला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांना शिक्षा होणे आवश्यक आहे. माझी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आग्रही मागणी आहे की या प्रकरणाची चौकशी करुन दोषी व्यक्तींना कठोर शासन करावे. आरोग्य यंत्रणेत काम करणाऱ्या तसेच राज्यातील प्रत्येक महिलेला सुरक्षित वातावरण मिळालेच पाहिजे ही आमची भूमिका आहे, असे ट्विट सुप्रिया सुळे यांनी केले.
फलटण, जि. सातारा येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत महिला डॉक्टरचे आत्महत्या प्रकरण अतिशय गंभीर आहे. या महिलेने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये तिने गेली काही दिवसांपासून तिचा शारिरीक आणि मानसिक छळ होत असल्याचे वरीष्ठांना वारंवार कळविले होते. परंतु तिच्या तक्रारीची दखल घेतली गेली…
— Supriya Sule (@supriya_sule) October 24, 2025
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List