लिंबू फिरवल्याच्या संशयातून अलिबागमध्ये कुटुंब वाळीत; रेवदंडा पोलिसांचे ३३ जणांवर गुन्हे
संशयातून ग्रामस्थांनी एका कुटुंबाला वाळीत टाकल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक म्हणजे एका मांत्रिकाने केलेल्या बतावणीवर विश्वास ठेवून ग्रामस्थांनी चार वर्षांपूर्वी गावकीची बैठक बोलावून हा निर्णय घेतला होता. मात्र बहिष्कारानंतर सुरू असलेला अन्याय सहन न झाल्याने कुटुंबीयांनी पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली. याप्रकरणी रेवदंडा पोलिसांनी ३३ जणांविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.
रेवदंडा येथील रामराज खैरवाडी परिसरात राहणारे धर्मा गडखळ यांचा १५ वर्षीय मुलगा कुणाल हा अचानक आजारी पडला. २०१९ मध्ये त्याचा मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी धर्मा हे पाटवाडी येथे राहणारे मांत्रिक लहू गडखळ व मधू गडखळ यांच्याकडे गेले होते. त्या मांत्रिकांनी मुलावर देवदेवस्की केली असून तुमच्याच गावात राहणाऱ्या तुकाराम दरोडा याने लिंबू फिरवल्याने कुणालचा मृत्यू झाल्याचे धर्मा यांना सांगितले. यावर संतापलेल्या धर्मा गडखळ यांनी तातडीने गावकीची बैठक बोलवली. यावेळी ग्रामस्थांनी कोणतीही शहानिशा न करता पुरावे नसताना दरोडा कुटुंबीयांवर करणी आणि देवदेवस्कीचा ठपका ठेवत ६० हजार रुपयांचा दंड ठोठावला.
दरोडा यांनी दंड भरण्यास नकार दिला असता गावकीचे पंच व ग्रामस्थ अशा एकूण ३३ जणांनी कुटुंबाला वाळीत टाकण्याचा निर्णय घेतला. त्याचा ठराव मंजूर करून दरोडा कुटुंबीयांशी संबंध ठेवणाऱ्यास ५ हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल व संबंध उघडकीस आणून देणाऱ्यास १ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल असे घोषित केले. मात्र ग्रामस्थांकडून वारंवार होणारा अन्याय असह्य झाल्याने तुकाराम दरोडा यांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात ग्रामस्थांविरोधात तक्रार नोंदवली आणि हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
धार्मिक, सामूहिक कार्यक्रमांसाठी प्रवेश नाकारला
२०२१ मध्ये ग्रामस्थांनी दरोडा कुटुंबीयांवर बहिष्कार टाकल्यानंतर त्यांना सभा, मेळावा, मिरवणुका, प्रार्थना अशा धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेण्यास प्रतिबंध घातला. तसेच गावातील सुखदुःखाच्या कार्यात सहभाग घेणे, गावातील मंदिरात प्रवेश करण्यास नकार दिला होता. गेली चार वर्षे दरोडा कुटुंब हा सामाजिक बहिष्कार सहन करत होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List