माधुरीची 31 ऑक्टोबरला आरोग्य तपासणी, घरवापसीच्या सर्व परवानग्या 20 दिवसांत घ्या, उच्चाधिकार समितीचे आदेश
माधुरी हत्तिणीची आरोग्य तपासणी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती दीपक वर्मा यांच्या नेतृत्वाखालील उच्चाधिकार समितीने दिले आहेत. त्यानुसार 31 ऑक्टोबरला वनतारा येथे राज्य शासन, नांदणी गाव जैन मठ व वनतारा प्रशासनाकडून माधुरीची तपासणी केली जाईल.
माधुरीला गुजरात येथून महाराष्ट्रात परत आणण्यासाठी आवश्यक सर्व परवानग्या 20 दिवसांत घ्या, असेही समितीने आदेशात नमूद केले. स्थानिक नियोजन प्राधिकरण, वन विभाग, स्थानिक प्रशासन व अन्य संबंधित प्राधिकरणाच्या यासाठी परवानग्या लागणार आहेत.
माधुरीची घरवापसी करण्यासाठी जैन मठ व वनतारा यांच्याकडून अॅड. मनोज पाटील यांच्यामार्फत संयुक्त प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या प्रस्तावावर समितीसमोर सुनावणी झाली. माधुरीच्या देखभालीसाठी सुसज्ज असे केंद्र वनतारा तयार करेल. त्यासाठी जैन मठ नांदणी गावातच जागा देईल हा प्रमुख मुद्दा अॅड. पाटील यांनी समितीसमोर मांडला. त्याची नोंद करून घेत समितीने हे आदेश दिले. यावरील पुढील सुनावणी 29 नोव्हेंबरला होणार आहे.
वनताराचा हक्क राहणार नाही
■ माधुरीसाठी सर्व सुविधा असलेला निवारा तयार केला जाईल.
■ बांधकामाचा आराखडा तयार करून समितीकडे सादर केला जाईल. समितीच्या सूचनेनुसार त्यात बदल केले जातील.
■ बांधकाम झाल्यानंतर वनताराने हा निवारा जैन मठाकडे हस्तांतर करावा.
■ निवाऱ्याचे बांधकाम झाल्यानंतर माधुरीला गुजरात येथून पाठवण्यासाठी समितीकडे अर्ज केला जाईल.
■ समितीने परवानगी दिल्यानंतर वनताराने जामनगर येथून हत्तिणीला नांदणीतील जैन मठात सुरक्षित आणावे.
■ माधुरीला परत दिल्यानंतर त्यावर वनताराचा कोणत्याही प्रकारचा अधिकार राहणार नाही.
■ उच्चाधिकार समिती व राज्य शासनाच्या आदेशानुसार अन्य हत्तीची येथे व्यवस्था केली जाईल.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List