संघाच्या शाखेत स्वयंसेवकांकडून लैंगिक छळ, केरळमध्ये अभियंत्याची आत्महत्या
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत स्वयंसेवकांकडून झालेल्या सततच्या लैंगिक छळामुळे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचे सांगत एका सॉफ्टवेअर इंजिनीअरने आत्महत्या केली आहे. केरळच्या तिरुवअनंतपुरम जिह्यात ही घटना घडली आहे. आत्महत्येच्या आधी त्याने आरएसएसवर अनेक गंभीर आरोप केल्याने देशभरात खळबळ उडाली आहे.
आनंदू अजि असे या 26 वर्षीय इंजिनीअरचे नाव आहे. तिरुवअनंतपुरमच्या थम्पनूर येथील एका लॉजमध्ये त्याचा मृतदेह आढळून आला. आनंदूने ज्या दिवशी आत्महत्या केली, त्याच दिवशी त्याने शेड्युल्ड केलेली पोस्ट इन्स्टाग्रामवर झळकली. त्यात त्याने आत्महत्येचे धक्कादायक कारण सांगितले आहे.
इन्स्टाग्राम पोस्टमध्ये काय…
‘मी प्रेमभंग, कर्ज किंवा इतर कुठल्याही कारणामुळे हा टोकाचा निर्णय घेतलेला नाही. जबर मानसिक आघात आणि नैराश्य हे यामागचे कारण आहे. माझी अशी अवस्था होण्यास आरएसएस ही संघटना आणि त्यातील एक व्यक्ती आहे. लहानपणी संघाच्या शिबिरांमध्ये माझा त्या माणसाने व इतर अनेक स्वयंसेवकांनी सतत लैंगिक छळ केला. माझ्या शरीराचा एखाद्या खेळण्यासारखा वापर केला. माझ्यासाठी तो आयुष्यभराचा धक्का होता. त्यातून मी कधीच सावरलो नाही,’ असे आनंदूने म्हटले आहे. ‘माझ्याप्रमाणे इतर अनेक मुलांना यातून जावे लागले आहे. त्यामुळे या संघटनेच्या लोकांना जवळ करू नका,’ असा इशाराही त्याने दिला आहे.
प्रियंका गांधी यांची चौकशीची मागणी
आनंदू अजि याने केलेल्या आरोपांची सखोल चौकशी करण्याची मागणी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी केली आहे. ‘आनंदू याने वारंवार आरएसएसचे नाव घेऊन आरोप केला आहे. त्याचे म्हणणे खरे असेल तर हे भयानक आहे. देशभरात लाखो मुले आणि तरुण आरएसएसच्या शिबिरांमध्ये जातात. त्यामुळे आरएसएसच्या नेतृत्वाने यावर तात्काळ खुलासा करावा व सर्व संबंधितांवर कारवाई करावी,’ अशी मागणी प्रियंका यांनी ‘एक्स’ पोस्टद्वारे केली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List