ठाण्यातील भ्रष्टाचार, लाचखोरी आणि पाणीचोरीविरुद्ध जनता रस्त्यावर; शिवसेना, मनसेसह महाविकास आघाडीचा महापालिकेवर धडक मोर्चा
ठाणे महापालिकेतील भ्रष्टाचार, अधिकाऱ्यांची खुलेआम लाचखोरी, बिल्डरांसाठी जनतेच्या पाण्याची होणारी चोरी, वाहतूककाsंडी, बेकायदा बांधकामांची बजबजपुरी, गुंडाराज आणि त्याला असलेला सत्ताधाऱ्यांचा पाठिंबा याविरुद्ध आज ठाणेकरांच्या संतापाचा उद्रेक झाला. शिवसेना, मनसेने ठाणे महापालिकेवर काढलेल्या मोर्चात महाविकास आघाडीसह हजारो ठाणेकर उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. ‘गली गली में शोर है, सत्ताधारी चोर है’, ‘चला रे चला, भ्रष्टाचारी सरकारला भिडायला, अन्यायाला गाडायला’, ‘लाचखोर लाचखोर, अधिकारी हरामखोर’ अशा गगनभेदी घोषणांनी अवघे ठाणे दणाणून गेले. गडकरी रंगायतन येथून निघालेला मोर्चा ठाणे महापालिकेवर धडकला तेव्हा महापालिका भवनाचे चारही रस्ते मोर्चाच्या गर्दीने ओव्हरपॅक झाले होते.
गेल्या तीन वर्षांपासून ठाणे महापालिकेचा बेबंद कारभार सुरू आहे. ठाणे महापालिकेच्या वर्धापन दिनाच्या दिवशीच अतिक्रमण विभागाच्या उपायुक्ताला 25 लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. ठाणेकरांवर सुरू असलेल्या अन्यायाला वाचा पह्डण्यासाठी शिवसेना आणि मनसेने आज ठाणे महापालिकेवर धडक मोर्चा काढला. या झंझावाती मोर्चाचे नेतृत्व शिवसेना नेते, माजी खासदार राजन विचारे, मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी केले. या मोर्चात घोडबंदरपासून कोपरी आणि वागळे इस्टेटपासून दिवापर्यंतचे हजारो ठाणेकर सहभागी झाले होते. हा मोर्चा साईपृपा हॉटेल, राममारुती रोड, सगुणा फार्म, घंटाळी मंदिर, तीन पेट्रोल कंप, आराधना टॉकीज, रायगड गल्लीमार्गे महापालिका मुख्यालयावर धडकला. तेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सरकारविरोधी घोषणांनी परिसर दणाणून गेला.
यावेळी शिवसेना खासदार संजय दिना पाटील, आमदार महेश सावंत, उपनेत्या ज्योती ठाकरे, उपनेते गुरुनाथ खोत, उपनेते विजय साळवी, माजी आमदार रमेश कोरगावकर, मनोहर भोईर, ओवळा-माजिवडा संपर्पप्रमुख नरेश मणेरा, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे, ठाणे जिल्हा संघटक रेखा खोपकर, कल्याण जिल्हा संघटक वैशाली दरेकर, एम. के. मढवी, पृष्णकांत कोळी, कल्याण ग्रामीण संपर्पप्रमुख रोहिदास मुंडे, दिवा शहरप्रमुख सचिन पाटील, राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष मनोज प्रधान, पनवेल महानगरप्रमुख अवचित राऊत, ठाणे उपशहरप्रमुख सचिन चव्हाण, मनसे ठाणे शहराध्यक्ष रवींद्र चव्हाण, संदीप पाचंगे, गजानन काळे, समीक्षा मार्पंडे यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
गोल्डन गँगच्या म्होरक्याने ठाणे महापालिका विकली
राज्यातील सर्वात जास्त भ्रष्टाचार ठाणे जिह्यात सुरू आहे. गेल्या तीन वर्षांत ठाणे महापालिकेचे ऑडिटच झाले नाही अशी कबुली आयुक्तांनीच दिली आहे. 375 कोटींचा हिशेबच लागत नाही. हे पैसे कोणाच्या खिशात गेले? ही महापालिका गोल्डन गँग लुटून खात आहे. या गोल्डन गँगच्या म्होरक्याने ठाणे महापालिका विकली आहे. या भ्रष्ट सत्ताधाऱ्यांना जनता उखडून फेकेल, असा टोला शिवसेना नेते राजन विचारे यांनी लगावला.
महापालिकेचे आयुक्त सौरभ राव हे हतबल नाहीत, तर राज्यकर्त्यांचे बटिक झाले आहेत. या भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालाल तर याद राखा. अन्यथा येत्या विधानसभा अधिवेशनात तुम्हाला सोडणार नाही. – भास्कर जाधव, शिवसेना नेते, आमदार
दरोडेखोरांना पकडायला अख्खा गाव एकत्र येते तसे ठाण्यातल्या गब्बरसिंगला संपवायला आम्ही एकत्र आलो आहोत. ठाणेकरांना धरण नाही, गोरगरीबांची बीएसयूपीची घरे कोणाला वाटली? हिंमत असेल तर चौकशी करा. – जितेंद्र आव्हाड, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष
हा मोर्चा म्हणजे संतप्त ठाणेकरांच्या संतापाची ठिणगी आहे. आता वणवाही पेटेल. भूमाफियांकडून अधिकारी चौरस फुटावर पैसे उकळत आहेत. घोटाळय़ांचा कळस झाला आहे. आता आम्हाला पालिका वाचवायची आहे. – अभिजित पानसे, मनसे नेते
पालिकेच्या तळमजल्यापासून ते चौथ्या मजल्यापर्यंत सर्व विभागात लुटमार सुरू आहे. धर्मवीर आनंद दिघेंच्या नावाला काळिमा फासण्याचे काम सत्ताधारी करत आहेत, पण आयुक्त मात्र धृतराष्ट्राच्या भूमिकेत आहेत. – विक्रांत चव्हाण, ठाणे शहर अध्यक्ष काँग्रेस
बोरसेंची बदली करणार
लाचखोर अधिकारी पाटोळेचा पैसा पुणाला पोहोचला, या प्रश्नावरही राव यांच्याकडे उत्तर नव्हते. सचिन बोरसे नावाचा अधिकारी वादग्रस्त आहे. ते निवडणूक विभागात आहेत. सत्ताधाऱ्यांचा कार्यकर्ता असल्यासारखे ते मिरवत आहेत. त्यामुळे त्यांची निवडणूक विभागातून तत्काळ बदली करा, त्याशिवाय आम्ही हटणार नाही, असा पवित्रा उपस्थित नेत्यांनी घेतला. तेव्हा बोरसे यांची निवडणूक विभागातून बदली करण्याचे आश्वासन आयुक्त राव यांनी दिले.
आयुक्तांना एक तास घेराव
शिवसेना नेते, आमदार भास्कर जाधव, शिवसेना नेते, माजी खासदार राजन विचारे, मनसेचे नेते अविनाश जाधव, अभिजित पानसे, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण, जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्यासह उपस्थित नेत्यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांना अक्षरशः एक तास घेराव घातला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List