आज सर्वपक्षीय शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार! लोकशाही बळकट व्हावी आणि निवडणूक यंत्रणेवरील विश्वास दृढ करण्यासाठी चर्चा
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता उद्या मंगळवारी दुपारी 12.30 वाजता सर्वपक्षीय नेत्यांचे शिष्टमंडळ राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेणार आहे. लोकशाही बळकट व्हावी आणि निवडणूक यंत्रणेवरील विश्वास अधिक दृढ व्हावा यासाठी शिष्टमंडळ आयोगासोबत चर्चा करणार आहे.
मुंबई महापालिकेसह राज्यातील सर्व महापालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषदा, पंचायत समिती निवडणुकीच्या तारखा लवकरच जाहीर होणार आहेत. या निवडणुकीच्या यंत्रणेवर आणि प्रक्रियेवर कोणताही संशय राहू नये आणि या निवडणुका पारदर्शक, निष्पक्ष पद्धतीने संविधानाचे पूर्ण पालन करून व्हाव्यात, अशी सर्वच पक्षांची भूमिका आहे. ही बाब राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऩयांसमोर मांडण्यात येणार आहे. शिष्टमंडळात शेकाप नेते जयंत पाटील, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सुभाष लांडे, माकपचे सरचिटणीस अजित नवले, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड, समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांचाही समावेश असणार आहे.
मतदार याद्यांचा घोळ
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील मतदार याद्यांत मोठय़ा प्रमाणात घोळ असल्याची बाब समोर आली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या निवडणुकांत मतचोरी झाल्याचा आरोप केला. त्यात महाराष्ट्रातील काही मतदारसंघांचाही डेटा समोर ठेवला. त्याकडेही राज्य निवडणूक आयोगाचे लक्ष वेधले जाणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना प्रक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह विविध पक्षांच्या प्रमुख नेत्यांचा शिष्टमंडळात समावेश असणार आहे.
मुख्यमंत्र्यांनाही आवाहन
या भेटीमागे कोणताही राजकीय हेतू नसून सर्वपक्षीय शिष्टमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आले आहे.
भेटीनंतर संयुक्त पत्रकार परिषद
मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर सर्वपक्षीय नेत्यांची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List