राज्यकर्ते सुधारले नाहीत तर देशात दोन महिन्यांत नेपाळसारखी परिस्थिती, प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली भीती
भारताच्या शेजारील देश असलेल्या नेपाळमध्ये तरुणांनी आंदोलनाच्या माध्यमातून सत्ता उलथवून टाकली आहे. सध्याचे राज्यकर्ते जर सुधारले नाहीत तर मला दिसत आहे की, दोन महिन्यांमध्ये नेपाळसारखी परिस्थिती आपल्याकडेदेखील उद्भवू शकते, अशी भीती वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे.
देशात पंधरा लाख तरुण बेरोजगार आहेत. अमेरिकेने टॅरिफ 50 टक्के केल्याने आयटी क्षेत्रातदेखील बेरोजगारी वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. नेपाळ, बांगलादेश पेटलेले असतानाही आपले सरकार याकडे गांभीर्याने बघत नाही. वेळीच दखल घेतली नाही तर भारताचा नेपाळ व्हायला वेळ लागणार नाही, असा इशारा आंबेडकर यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना दिला.
50 टक्के टॅरिफमुळे बेरोजगारीचा धोका
अमेरिकेसोबतच्या विदेश धोरणाबाबत केंद्र सरकार भारतीयांना गंडवत आहे. अमेरिकेनं लादलेली 50 टक्के टॅरिफ जर कमी झालं नाही तर सध्या जी आकडेवारी समोर येत आहे त्यानुसार टेक्स्टाईल इंडस्ट्रीतील एक कोटी दहा लाख कर्मचारी बेरोजगार होतील. तसेच गुजरातमध्ये असलेली जेम्स आणि ज्वेलरीच्या उद्योगांमध्येदेखील दहा लाख कर्मचारी बेरोजगार होतील.
मंत्रालयासमोर आंदोलन करा
सध्या राज्यकर्ते घाबरलेले आहेत. त्यामुळे राज्यकर्त्यांच्या घाबरटपणाचा फायदा आपण घेतला पाहिजे. पीएचडीचे विद्यार्थी आपल्या विविध मागण्यांसाठी पुण्यामध्ये उपोषणाला बसले आहेत. तीन दिवस झाले तरीही पोलिसांनी त्यांची दखल घेतलेली नाही. त्यामुळे दखलपात्र गुन्हा करणे आवश्यक असून त्यासाठी मंत्रालयासमोर शांततेने आंदोलन करणे आवश्यक असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List