विरारमधील रमाबाई अपार्टमेंट कोसळली; 17 ठार, 9 जखमी, ऐन गणेशोत्सवात रहिवाशांवर ‘विघ्न’, 10 वर्षांपूर्वी बांधलेली इमारत जमीनदोस्त

विरारमधील रमाबाई अपार्टमेंट कोसळली; 17 ठार, 9 जखमी, ऐन गणेशोत्सवात रहिवाशांवर ‘विघ्न’, 10 वर्षांपूर्वी बांधलेली इमारत जमीनदोस्त

सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू असतानाच विरारच्या विजयनगर परिसरात असलेल्या रमाबाई अपार्टमेंटचा मोठा भाग मंगळवारी रात्री उशिरा पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. या दुर्घटनेत १७ जण ठार झाले असून ९ रहिवासी गंभीर जखमी झाले आहेत. ऐन सणासुदीच्या काळात हे विघ्न आल्याने विरारमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेच्या निमित्ताने वसई-विरारमधील धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या हजारो रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

विरार पूर्वेमध्ये रमाबाई अपार्टमेंट ही चार मजली इमारत असून ती दहा वर्षांपूर्वी बांधली होती. महापालिकेने इमारत धोकादायक म्हणून जाहीर केली होती. प्रशासनाने वारंवार नोटीस बजावूनदेखील रहिवाशांनी घरे रिकामी केली नाहीत. अखेर भरपावसातच मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास इमारतीचा काही भाग कोसळला. रहिवासी गाढ झोपेत असताना ही दुर्घटना घडली. आजूबाजूच्या चाळींवर इमारतीचा ढिगारा पडल्याने तेथील नागरिकदेखील दबले गेले. इमारत पडल्याचे समजताच एनडीआरएफसह फायर ब्रिगेड, आपत्कालीन पथक व स्वयंसेवी संस्थांच्या सदस्यांनी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. दरम्यान पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी घटनास्थळी भेट देऊन मदतकार्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

बिल्डरवर गुन्हा दाखल

केवळ दहा वर्षांपूर्वी बांधलेली रमाबाई अपार्टमेंट थोड्याच कालावधीनंतर खिळखिळी झाली होती. महापालिकेने नोटीस तर बजावलीच पण तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करा, असेही सांगितले होते. मात्र त्याकडे बिल्डर नितल साने याने दुर्लक्ष केले. अखेर इमारत कोसळून १७जणांना आपला जीव गमवावा लागला. याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात नितल साने याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इमारतीमध्ये ४८ फ्लॅट आणि दुकाने होती.

चिमुकल्या उत्कर्षाचा पहिला वाढदिवस अखेरचा ठरला

रमाबाई अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या चिमुकल्या उत्कर्षा जोविल हिचा मंगळवारी पहिला वाढदिवस होता. त्यासाठी घरात नातेवाईक, मित्र, मैत्रिणी आल्या होत्या. संपूर्ण घर वाढदिवसानिमित्ताने सजवले होते. आनंदाच्या वातावरणातच हॅप्पी बर्थडे टू यू उत्कर्षा.. असे म्हणत केकही कापला. फोटो काढले. पण हा आनंद काही क्षणच टिकला. रात्री उशिरा इमारत कोसळली आणि उत्कर्षासह तिची आई आरोही (२४) व वडील ओमकार (२८) या तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. संपूर्ण कुटुंब मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. उत्कर्षाचा पहिला वाढदिवसही अखेरचा ठरला.

कॉल आल्याने तो बचावला

देव तारी त्याला कोण मारी याचा प्रत्यय विरारवासीयांना आला. दुर्घटनाग्रस्त इमारतीत हरिश बिष्ट, दीपक बोहरा, गोविंद रावत व पंकज जिना हे दुसऱ्या मजल्यावर एकत्र राहात होते. पंकज हा जहाजावर काम करीत होता. तर अन्य तिघेजण कॅटरिंग व्यवसायात होते. इमारत कोसळण्यापूर्वी १५ मिनिटे आधी पंकज याला फोन आल्याने तो बाहेर पडला. त्यानंतर काही क्षणातच रमाबाई अपार्टमेंट कोसळली. पण पंकज सुदैवाने बचावला.

मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत

इमारत दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या रहिवाशांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली असून त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला.

मृतांची नावे

आरोही जोविल (२४), उत्कर्षा जोविल (१), लक्ष्मण किसकू सिंग (२६), दिनेश सकपाळ (४३), सुप्रिया निवळकर (३८), अर्नव निवळकर (११), पार्वती सकपाळ (६०), दीपेश सोनी (४१), सचिन निवळकर (४०), हरिश सिंग बिष्ट (३४), सोनाली तेजाम (४१), दीपक बोहरा (२५), कशिश सहेनी (३५), शुभांगी सहेनी (४०), गोविंद रावत (२८), ओमकार जोविल (२७), रोहिणी चव्हाण (३७).

जखमींची नावे

जखमींमध्ये प्रभाकर शिंदे, प्रमिला शिंदे, प्रेरणा शिंदे, प्रदीप कदम, जयश्री कदम, मिताली परमार, संजॉय सिंग, मंथन शिंदे, विशाखा जोविल या नऊ जणांचा समावेश आहे. त्यांच्यावर वसई-विरारमधील शासकीय व खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी दोघांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

जर तुम्हीही सकाळी रिकाम्या पोटी पाणी पित असाल तर हे नक्कीच जाणून घ्या जर तुम्हीही सकाळी रिकाम्या पोटी पाणी पित असाल तर हे नक्कीच जाणून घ्या
आरोग्याबाबत जागरूक राहायला किंवा निरोगी राहायला सर्वानाच आवडतं.त्यासाठी प्रत्येकजण काहीना काही उपाय करत असतात. या सवयींपैकी एक म्हणजे सकाळी उठल्यानंतर...
झोपताना उशाजवळ लिंबाच्या तुकड्यावर थोडंसं मीठ लावा अन् ठेवा, तुम्हाला हे 5 आश्चर्यकारक फायदे नक्कीच मिळतील
Maratha Reservation – खाऊ गल्ली, हॉटेल बंद, पाण्याचीही सोय नाही, सरकार म्हणजे इंग्रजांपेक्षा बेकार आहे; जरांगेंची महायुतीवर सडकून टीका
Photo – मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले
अजित पवारांच्या दिशेने कांद्याची माळ भिरकावण्याचा प्रयत्न, दोघे पोलिसांच्या ताब्यात
फ्रिजमध्ये चुकूनही ठेवू नका ही 5 फळे; अन्यथा आरोग्यावर होईल वाईट परिणाम
Photo – आरक्षणाच्या मागणीवर मराठा ठाम, लाखोंच्या जनसमुदायाने मुंबई व्यापली