Sindhudurg News – सिंधुदुर्ग-कोल्हापूरला जोडणारा गगनबावडा घाट वाहतुकीसाठी खुला होणार
करुळ घाटात काही दिवसापूर्वी दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर प्रशासनाने 4 सप्टेंबर पासून वाहतूक बंद करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, धोकादायक दरडी काढण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे शनिवार दिनांक 13 सप्टेंबर पासून सिंधुदुर्ग कोल्हापूर जोडणारा करुळ गगनबावडा घाट पूर्ववत वाहतुकीसाठी खुला करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
करूळ घाटात दिनांक 4 सप्टेंबर रोजी गगनबावड्यापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर यु आकाराच्या वळणावर दरडीचा भाग रस्त्यावर कोसळून वाहतूक ठप्प झाली होती. रस्त्यावर पडलेली ही दरड काढत असताना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरडीला तडे गेल्याचे दिसून आले. त्यामुळे धोकादायक दरडीचा भाग काढल्याशिवाय वाहतूक सुरू करणे धोक्याचे होते. या दरडी काढण्यासाठी पाच-सहा दिवसांचा कालावधी अपेक्षित होता. त्यामुळे या घाटमार्गातील वाहतूक 12 तारखेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता.
दरम्यान करूळ घाटातील या धोकादायक दरडींचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या तज्ज्ञ समितीकडून पाहणी करण्यात आली. या तज्ज्ञ समितीने संपूर्ण घाटाची पाहणी केली. यानुसार पाच ते सहा ठिकाणी अशा प्रकारच्या धोकादायक दरडी निश्चित केल्या. त्यानंतर या धोकादायक दरडी काढण्यासाठी या कामात पारंगत असलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील एस. एस. पी. एल. कंपनीला बोलवण्यात आले होते. या कंपनीने गेल्या शनिवारपासून धोकादायक तडे गेलेल्या दरडी काढण्याचे काम सुरू करण्यात आले होते. कुशल मनुष्य बळ वापरून या दरडी काढण्यात येत आहेत.
डोंगरावर सुमारे 50 ते 60 फूट उंचावर दोरखंडाच्या साहाय्याने जाऊन या दरडी काढण्याचे अतिशय जोखमीचे काम करण्यात आले. गेले पाच सहा दिवस पावसाने उघडीप दिल्यामुळे हे काम लवकर पूर्ण करता आले. शुक्रवारी दरडी काढून पूर्ण मार्ग मोकळा करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी घाट मार्गातील वाहतूक 13 सप्टेंबर पासून सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List