संपूर्ण महाराष्ट्र ठाकरेंच्याच मागे जाणार! नाशिकमधील विराट मोर्चातून संजय राऊत यांची गर्जना

संपूर्ण महाराष्ट्र ठाकरेंच्याच मागे जाणार! नाशिकमधील विराट मोर्चातून संजय राऊत यांची गर्जना

नाशिकमध्ये आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), मनसेचा संयुक्त जनआक्रोश मोर्चा निघाला. हा विराट मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यानंतर मोर्चाचे रुपांतर एका सभेत झाले. यावेळी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी दोन्ही बाजूंच्या सैनिकांना संबोधित केले. यापुढे नाशिकचा प्रत्येक कार्यक्रम संयुक्तच होणार. नाशिकच नाही तर महाराष्ट्रात होणार. दोन भाऊ एकत्र आलेत. दोन महाराष्ट्राचे बंधू एकत्र आलेत, ठाकरे बंधू एकत्र आलेत, नेते एकत्र आले आणि कार्यकर्ते एकत्र आल्यावर हा महाराष्ट्र यापुढे फक्त ठाकरेंच्यायच मागे जाईल, अशी गर्जना यावेळी संजय राऊत यांनी केली.

छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर फक्त फोटो काढून चालत नाही तर रक्तामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असले पाहिजेत. आणि इथे समोर दोन्ही बाजूंनी जे सैनिक बसले आहेत त्यांच्या रक्तात छत्रपती शिवाजी महाराज आहेत म्हणून ते रस्त्यावर उतरले आहेत, सरकारला आव्हान देण्यासाठी उतरले आहेत. हा जनआक्रोश मोर्चा आहे. हा जनतेचा आक्रोश जेव्हा रस्त्यावर उतरतो तेव्हा काय होतं? तेव्हा नेपाळ होतो, बांगलादेश होतो, हा इशारा देण्यासाठी हा मोर्चा आहे. माझ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी शिंदे गटाचे लोकं मुंबई पोलीस आयुक्तांना भेटायला गेले, का? तर त्यांचं म्हणणं आहे, मी म्हाणालो महाराष्ट्राचा नेपाळ होईल, अरे झालेलाच आहे. नेपाळमध्ये लोक रस्त्यावर का उतरली? याचं कारण नाशिकमध्ये आहे. प्रचंड भ्रष्टाचार, सरकारी पैशाची लूट, अंमली पदार्थांचा प्रचंड व्यापार, तरुण मुलं नशेच्या आहारी गेली हे नाशिकमध्ये दिसतंय, असा हल्ला संजय राऊत यांनी यावेळी चढवला.

आपल्या राज्यकर्त्यांनी नेपाळमधल्या उद्रेकाकडे गांभीर्याने पहावं, संजय राऊत यांचे विधान

इथे लावलेला राहुल धोत्रेचा फोटो पाहून मन अस्वस्थ आहे. राहुल धोत्रे या तरुण मुलाची हत्या झाली. कोणी केली? देवेंद्र फडणवीसांच्या कार्यकर्त्यांनी, गिरीश महाजनच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे. कुठे गेला आरोपी, कसा मिळत नाही. आमचे आंदोलन करणारे कार्यकर्ते बरोबर मिळतात. पण तुमचा एक नगरसेवक खून करून फरार होतो. तो फरार असताना गिरीश महाजनला बंगल्यावर जाऊन भेटतो. त्याला कोण वाचवतंय? तो कुठल्या सरकारी बंगल्यात लपला आहे? हे जर राज्याच्या गृहमंत्र्याला आणि नाशिकच्या पालकमंत्र्याला माहिती नसेल तर तुम्ही राज्य करायला नालायक आहात. तरुण मुलांच्या हत्या होताहेत. नाशिकमध्ये 40 खून झालेत. आता ज्या हत्या होत आहेत त्या जमिनी लुबाडण्यासाठी, लूटमार करण्यासाठी हे नाशिकचं चरित्र आहे. आणि हे नाशिक आपल्याला बदलायचं आहे. आणि म्हणून हा मोर्चा आहे, ही सुरुवात आहे. हा संयुक्त मोर्चा आहे. यापुढे नाशिकचा प्रत्येक कार्यक्रम संयुक्तच होणार. नाशिकच नाही तर महाराष्ट्रात होणार आहे. दोन भाऊ एकत्र आलेत. महाराष्ट्राचे दोन बंधू एकत्र आलेत, ठाकरे बंधू एकत्र आलेत, नेते एकत्र आले आणि कार्यकर्ते एकत्र आल्यावर हा महाराष्ट्र यापुढे फक्त ठाकरेंच्यायच मागे जाईल, हा सुद्धा संदेश नाशिकने दिल्याचे संजय राऊत म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधी पक्षनेत्यांसोबत नाशिकमध्ये फिरावं, संजय राऊत यांचे आव्हान

फार मोठ्या संख्यने नाशिककर रस्त्यावर उतरले, मी त्यांचा आभारी आहे. शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचं कुळ आणि मूळ एकच आहे. आणि आपल्या सगळ्यांचा मायबाप हे माननीय बाळासाहेब ठाकरे हेच आहेत. त्यामुळे यापुढे आमच्याशी समाना करताना खूप काळजी घ्यावी लागेल, असा इशारा संजय राऊत यांनी पक्ष विरोधकांना दिला. नाशिकमध्ये गुंडगिरी, नाशिकमध्ये हनीट्रॅप सुरू आहे. हे चित्र बदलायचं असेल तर उद्याच्या महानगरपालिकेपासून आपल्याला सुरुवात करावी लागेल. परिवर्तन करावं लागेल. जिल्हा परिषदा, नगरपालिका येतील. व्होट चोरी करून आलेलं हे सरकार आहे, बोगस सरकार आहे. चोऱ्यामाऱ्या व्होटचोऱ्या करून हे सरकार सत्तेवर आलेलं आहे, आमदार निवडून आलेले आहेत. त्यांना आपण घालवू. पण त्याच्या आधी महानगरपालिका संयुक्तपणे आपण ताब्यात घेतली पाहिजे. हे चित्र आपल्याला बदलायची जबाबदारी आहे आणि नाशिकपासून आपण सुरू करतोय, असे संजय राऊत यावेळी म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

जिममध्ये वजन उचलताना दुखापत? मग विम्याचा करता येणार का दावा? जाणून घ्या जिममध्ये वजन उचलताना दुखापत? मग विम्याचा करता येणार का दावा? जाणून घ्या
धावपळीच्या जगात प्रत्येकाला फिट, तंदुरुस्त राहावे वाटते. प्रत्येकाला डोलेशोले तयार करायचे नाहीत. पण सुटलेले पोट आणि थकलेले चेहरा अनेकांना नको...
मुंबईत स्पाइसजेटच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, उड्डाणानंतर निघालं चाक
अखेर दोन वर्षांनी पंतप्रधानांना वेळ मिळाला, उद्या मोदी मणिपूरला भेट देणार
Asia Cup 2025 – पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या अष्टपैलू खेळाडूने संघाची साथ सोडली
रत्नागिरीत तिळाच्या शेतीचे क्षेत्र घट, स्थानिक पातळीवर संवर्धनाची नितांत गरज
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत सापडले हजारो अपात्र लाभार्थी, सरकारला 100 कोटींहून अधिक नुकसान
आज खरी भाजप सत्तेत नाहिये, भारत – पाकिस्तान सामन्यावरून आदित्य ठाकरे यांचा टोला