उपचार नाही, साईड इफेक्ट खूप… कबुतरांचा सर्वाधिक धोका कोणत्या वयोगटाला?; वेळीच सावध व्हा
मुंबईतील कबुतरखान्याचा वाद आता चांगलाच पेटला आहे. कबुतरांमुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होत असल्याच्या तक्रारींनंतर, मुंबई महानगरपालिकेने (BMC) शहरातील कबुतरखाने बंद करण्याचा कठोर निर्णय घेतला आहे. हा वाद नुकताच सर्वोच्च न्यायालयात पोहोचला होता, जिथे दादरमधील एका कबुतरखान्याबाबत दाखल केलेली विशेष याचिका फेटाळण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयात निर्णय होईल असे स्पष्ट केले आहे. यामुळे कबुतरांमुळे होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांवर पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
कबुतरांमुळे होणाऱ्या आजारात भारतात 50 टक्क्यांनी वाढ
कबुतरांमुळे श्वास घेण्यास अडचणी होतात, असे म्हटले जाते. कबुतरांमुळे होणाऱ्या आजारांवर फुफ्फुस आणि श्वसनप्रणालीचे तज्ञ असलेले डॉ. दीपक भानुशाली यांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, कबुतरांमुळे हायपरसेन्सिटिव्हिटी न्यूमोनिटिस (Hypersensitivity Pneumonitis) हा धोकादायक आजार होतो. हा आजार भारतात, विशेषतः मुंबई आणि महाराष्ट्रात खूप सामान्य झाला आहे. इतर देशांच्या तुलनेत हा आजार भारतात 50 टक्क्यांनी वाढला आहे. आम्ही दर महिन्याला या आजाराचे 2 ते 3 रुग्ण पाहतो. या आजारावर उपचार करणे अत्यंत अवघड आहे, अशी माहिती डॉ. दीपक भानुशाली यांनी दिली.
लक्षणं काय?
हायपरसेन्सिटिव्हिटी न्यूमोनिटिस हा आजार कबुतरांच्या विष्ठेतील किंवा त्यांच्या पंखांमधील सूक्ष्म कणांमुळे होतो. हे कण श्वासावाटे शरीरात गेल्यावर फुफ्फुसांना गंभीर इजा होते. या आजारामुळे फुफ्फुसे कायमची निकामी होऊ शकतात. या आजाराच्या रुग्णांना सुरुवातीला ताप येतो, नंतर त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. या आजारावर कोणताही निश्चित उपाय नाही. उपचारासाठी स्टेरॉइड्सचा वापर केला जातो, पण त्याचे अनेक दुष्परिणाम आहेत. या आजारातून पूर्णपणे बरे होण्यासाठी फुफ्फुस प्रत्यारोपण हा एकच मार्ग आहे, जो अत्यंत खर्चिक असल्याने सर्वसामान्यांना परवडणारा नाही. त्यामुळे, या आजारापासून दूर राहणे हेच सर्वात महत्त्वाचे आहे, असेही डॉ. दीपक भानुशाली यांनी सांगितले.
पशुवैद्यक डॉ. देवयानी कायंदे यांनीही कबुतरांमुळे होणाऱ्या धोक्यांची माहिती दिली आहे. “कबुतरांच्या विष्ठेमुळे हवा दूषित होते, ज्यामुळे शरीरात इन्फेक्शन होऊ शकते. कबुतरांच्या अंगावर उवा असतात. यामुळे शहरात आजार पसरण्यास मदत होते. कबुतरे स्वतःचे अन्न स्वतःच शोधू शकतात. लोकांनी त्यांना दाणे टाकणे बंद केल्यास त्यांची संख्या आपोआप कमी होईल. ते इतर ठिकाणी जातील. एकाच ठिकाणी अन्न मिळत असल्यामुळे त्यांची संख्या वाढते. ते तिथेच थांबतात. अनेक देशांमध्ये, विशेषतः सिंगापूरमध्ये, रस्त्यावर उघड्यावर अन्न टाकणाऱ्यांवर दंड आकारला जातो, असे देवयानी कायंदे यांनी सांगितले.
डॉक्टरांचे नागरिकांसाठी महत्त्वाचे सल्ले काय?
- कबुतरांच्या संपर्कात जाणे टाळा.
- त्यांना दाणे टाकणे पूर्णपणे बंद करा.
- कबुतरखान्यांच्या परिसरात राहणाऱ्या लोकांनी मास्क वापरणे अनिवार्य आहे.
धार्मिक किंवा पाप-पुण्याचा मुद्दा नाही
हा धार्मिक किंवा पाप-पुण्याचा मुद्दा नसून, आपल्या आरोग्याचा प्रश्न आहे. त्यामुळे कबुतरांशी जास्त संपर्कात राहू नका. त्यांना खाणं देऊ नका. कबुतरांमुळे होणारा हा आजार प्रत्येकालाच होईल असे नाही, पण ज्यांना मधुमेह किंवा उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, त्यांना याचा धोका जास्त असतो. त्यामुळे कबुतरांपासून सुरक्षित अंतर राखणे हाच सध्याचा सर्वात चांगला उपाय आहे. महापालिकेने घेतलेल्या या निर्णयामुळे मुंबईकरांच्या आरोग्याचे रक्षण होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे, असेही डॉ .दीपक भानुशाली म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List