मुसळधार पावसामुळं लातूर जिल्ह्यात हाहाकार; रस्ते, पूल पाण्याखाली, मांजरा नदीला महासागराचं रूप, निलंगात वीज पडून जनावरं दगावली
लातूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसामुळे हाहाकार उडाला असून अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. नदी, नाले, ओढे तुडुंब झाले असून पुराचे पाणी वाड्या वस्तीत घुसले आहे. त्यामुळे सैन्य दलालाही पाचारण करण्यात आले आहे.
नदीला महासागराचे स्वरूप
मांजरा नदीला आलेल्या पुरामुळे उजेड परिसरात नदीला महासागराचे स्वरुप प्राप्त झाले आहे. पाण्याने प्रचंड वेग धारण केलेला आहे असून हे पाणी गावात शिरले आहे. तसेच शेतातील पिकाच्या वरून चार ते पाच फूट पाणी आहे. अनेक रस्ते बंद करण्यात आले असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला जात आहे. पोलीस प्रशासन नायब तहसीलदार, तलाठी, ग्रामसेवक परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
मांजरा नदीचे पाणी गावात शिरले
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील मौजे उजेड परिसरातील कोपलेल्या मांजरा नदीच्या पाण्याने आता गावात प्रवेश केला आहे. पाणी गावात शिरले असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले जात आहे.
निलंगा ते उदगीर राज्य मार्ग ठप्प
लातूर जिल्ह्यात पावसाने दाणादाण उडविली आहे. जिल्ह्यातील अनेक मार्गावरील रस्ते वाहतूक ठप्प झाली आहे. निलंगा ते उदगीर हा एक जिल्ह्यातील प्रमुख राज्य मार्ग असून तो ठप्प झाला आहे. राज्य महामार्ग 238 निलंगा ते उदगीर या मार्गावर धनेगाव येथील मांजरा नदीच्या पुलावरून पाणी जात असल्याने हा रस्ता बंद झाला आहे. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा असे आवाहन करण्यात येत आहे.
Latur News – अतिवृष्टीमुळे लातूरमध्ये जनजीवन विस्कळीत, सैन्य दलाचे पथक दाखल, 10 जणांची सुखरूप सुटका
वीज पडून चार जनावरे दगावली
निलंगा तालुक्यातील शेळगी येथे गुरुवारी मध्यरात्री शेतातील गोठ्यावर वीज कोसळल्याने चार जनावरं दगावली. शेतकरी पंढरीनाथ सोपानराव गुंडूरे यांची एक म्हैस, दोन गायी व एक वासरू असे एकूण चार जनावरे दगावली असून सदरील शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List