बारामतीचा ‘सस्पेन्स’ अजित पवार यांनी वाढवला, पण बोलता बोलता हे बोलून गेले…
लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या जागा वाटपाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी मंगळवारी जागा वाटपाची तारीख जाहीर केली. महायुतीच्या जागा वाटपाचे ९९ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्याची अधिकृत घोषणा महायुतीमधील तिन्ही पक्षांचे नेते येत्या २८ मार्च रोजी करणार आहे. यावेळी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार जाहीर केला. रायगड लोकसभा मतदार संघामधून सुनील तटकरे राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली. त्याचवेळी बारामतीमधील जागेसंदर्भात सस्पेन्स वाढवला. परंतु बोलता बोलता उमेदवार कोण असणार? याचा चेंडू पत्रकारांच्या पारड्यात टोलवला.
बारामती सर्वाधिक हॉट सिट
राज्यात सर्वाधिक हॉट लोकसभा मतदार संघ म्हणून गेल्या काही दिवसांपासून बारामतीची चर्चा आहे. या ठिकाणी महाविकास आघाडीने शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनी जोरदार प्रचार सुरु केला आहे. त्याचवेळी या मतदार संघातून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा सुरु होती. त्यांचे बारामती मतदार संघात दौरे वाढले आहेत. त्या आणि त्यांच्या कुटुंबियांकडून प्रचार सुरु झाला आहे. सुनेत्रा पवार यांनी केलेल्या कामांच्या रथही मतदार संघात फिरत आहेत. यामुळे सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी नणंद-भावजय लढत होणार असल्याची चर्चा सुरु आहे.
कधी जाहीर करणार उमेदवार
मंगळवारी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार जाहीर केला. यावेळी शिरुर लोकसभा मतदार संघातील दुसरा उमेदवार संध्याकाळी जाहीर करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. त्यानंतर अजित पवार यांना बारामती मतदार संघात कोण उमेदवार असणार? हा प्रश्न विचारण्यात आला. २८ तारखेलाच उमेदवाराचे नाव सांगणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. परंतु तुमच्या मनात जे नाव आहे, तोच उमेदवार असणार आहे, अशी पुष्टी अजित पवार यांनी जोडली. यामुळे बारामती मतदार संघात सुनेत्रा पवार याच उमेदवार असणार आहे, अशी शक्यता आहे.
शिवतारे यांच्यामुळे तिरंगी लढत?
बारामती मतदार संघात विजय शिवतारे यांनीही आपली उमेदवारी जाहीर केली आहे. शिवसेनेतून बाहेर पडून त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु शिवतारे यांनी आपला निर्णय बदलला नाही. यामुळे बारामतीमध्ये तिरंगी लढत होणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List