ICC Ranking – ना सूर्यादादा, ना प्रिन्स; टीम इंडियाचा युवा खेळाडू अभिषेक शर्मा टी-20 चा नवा किंग
हिंदुस्थान आणि इंग्लंड संघात पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरू असताना आयसीसीने ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. त्यानुसार कसोटी फलंदाजांमध्ये धावांचा पाऊस पाडणारा इंग्लंडचा ज्यो रुट अव्वल स्थानावर विराजमान आहे, तर वन डे आणि टी-20 क्रमवारीमध्ये अनुक्रमे शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा यांची वर्णी लागली आहे. अभिषेक शर्मा याने ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ट्रेव्हिस हेड याला दुसऱ्या स्थानावर ढकलत पहिल्या स्थानावर अव्वल स्थान पटकावले.
ताज्या टी-20 क्रमवारीमध्ये अभिषेक शर्मा 829 गुणांसह पहिल्या स्थानावर विराजमान आहे. विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांच्यानंतर टी-20 क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचलेला अभिषेक शर्मा तिसराच खेळाडू आहे. अभिषेक शर्मासह टॉप 10मध्ये हिंदुस्थानचे आणखी दोन खेळाडू आहेत. तिलक वर्मा तिसऱ्या, सूर्यकुमार यादव सहाव्या स्थानावर आहे. तर यशस्वी जैस्वाल 11व्या स्थानावर विराजमान आहे.
अभिषेक शर्मा याने गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने झिम्बाब्वेविरुद्ध दमदार शतक ठोकले होते. तसेच दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडविरुद्ध झालेल्या टी-20 मालिकेमध्येही त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडला होता. या बळावर त्याने क्रमवारीत पहिले स्थान पटकावले आहे. गोलंदाजीत वरुण चक्रवर्ती तिसऱ्या स्थानावर आहे.
वन डे क्रमवारीमध्ये शुभमन गिल पहिल्या स्थानावर आहे. रोहित शर्मा तिसऱ्या, विराट कोहली चौथ्या स्थानावर आहे. यासह टॉप 10 मध्ये श्रेयस अय्यर हा आणखी एक हिंदुस्थानी खेळाडू असून तो आठव्या स्थानावर आहे. गोलंदाजीत कुलदीप यादव दुसऱ्या स्थानावर आहे.
पंत सातव्या स्थानी, अष्टपैलूत जडेजा बेस्ट
आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत टॉप 10 मध्ये हिंदुस्थानचे तीन खेळाडू आहेत. जायबंदी असतानाही मँचेस्टर कसोटीत मैदानात उतरून अर्धशतक ठोकणारा ऋषभ पंत याने सातव्या स्थानावर उडी घेतली आहे. तर यशस्वी जैस्वाल याच्या क्रमवारीत तीन स्थानांची घसरण झाली असू नतो 8व्या स्थानावर पोहोचला आहे. शुभमन गिल नवव्या स्थानावर आहे. तर अष्टपैलूंच्या यादीत रविंद्र जडेजा पहिल्या स्थानावर कायम आहे. तसेच गोलंदाजीत जसप्रीत बुमराहने पहिले स्थान कायम राखले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List