टीम इंडियाचा ‘पाय’ खोलात! ऋषभ पंत संपूर्ण मालिकेतून बाहेर, 6 आठवडे सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला
पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशा पिछाडीवर असलेल्या टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा विस्फोटक यष्टीरक्षक खेळाडू ऋषभ पंत पायाला झालेल्या दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर झाला आहे. मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर सुरू असलेल्या अँडरसन-तेंडुलकर मालिकेतील चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी पंतच्या उजव्या पायाच्या बोटांना मोठी दुखापत झाली होती. ही दुखापत गंभीर असून डॉक्टरांनी त्याला 6 आठवडे सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे. ‘हिंदुस्थान टाइम्स‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
मँचेस्टर कसोटीत ख्रिस व्होक्सच्या एका यॉर्करला रिव्हर्स स्विप मारण्याच्या प्रयत्नात तो चेंडू थेट ऋषभ पंतच्या पायावर आदळला. चेंडूचा मारा इतका अचूक होता की, पंत अक्षरशः कळवळला. त्याला उभेही राहता येत नव्हते. काही सेकंदांत त्याचा पायही सूजला आणि पायाला जखमही झाली. या दुखापतीमुळे त्याला जखमी निवृत्त होऊन मैदानही सोडावे लागले.
पंतसाठी या वेदना नेहमीच्याच झाल्या आहेत. याआधी आदळलेल्या चेंडूने ऋषभ पंतचा दंड काळानिळा केला होता. त्यानंतर लॉर्ड्स कसोटीत त्याच्या बोटाला झालेल्या दुखापतीमुळे तो यष्टिरक्षणालाही उतरला नव्हता. त्या दुखापतीतून स्वतःला सावरत नाही तोच आता त्याला पुन्हा दुखापत झाल्याने संघ चिंतीत आहे.
ऋषभ पंत याच्या पायाच्या बोटाला फ्रॅक्टर झालेले असून त्यामुळे तो कसोटी मालिकेतून बाहेर गेला आहे. या दुखापतीतून सावरण्यासाठी पंतला किमान दोन महिन्यांचा कालावधी लागेल. परंतु वेदना विसरून पंत या लढतीत पुन्हा फलंदाजीला येतो का हे पाहणे औत्सुक्याचे आहे. पंत फलंदाजीला येऊ शकला नाही तर टीम इंडियाला मोठा धक्का असेल. त्याच्या जागी ध्रुव जुरेल हा दुसऱ्या डावात क्षेत्ररक्षण करताना दिसेल. अर्थात याबाबत बीसीसीआयनेही अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
…तर हिंदुस्थानला 10 फलंदाजांसह खेळावे लागेल
आयसीसीच्या नियमानुसार एखाद्या खेळाडूच्या डोक्याला दुखापत झाली तर त्याला बदली फलंदाज उपलब्ध करून दिला जातो. कन्कशन नियमानुसार हा पर्याय दिला जातो. मात्र पंतच्या पायाला दुखापत झालेली असल्याने हिंदुस्थानला पर्यायी फलंदाज मिळणार नाही. पण पंतच्या जागी पर्यायी क्षेत्ररक्षक मिळेल. याचा अर्थ ध्रुव जुरेल दुसऱ्या डावात यष्टीरक्षण करू शकतो, पण त्याला फलंदाजी करता येणार नाही. त्यामुळे हिंदुस्थानला 10 फलंदाजांसह खेळावे लागेल.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List