थायलंड आणि कंबोडियामध्ये हवाई हल्ले सुरू; शिवमंदिरांशी संबंधित सीमावाद पेटला
कंबोडिया आणि थायलंडमधील वादग्रस्त सीमेवरून तणाव शिगेला पोहोचला आहे. कंबोडिया आणि थायलंडने एकमेकांवर हल्ले केले आहेत. हे प्रकरण फक्त गोळीबार करण्यापुरते मर्यादित नाही, थायलंडने दोन कंबोडियन लष्करी तळांवर हवाई हल्ले केल्याची पुष्टी थाई सैन्याने केली आहे.
कंबोडियन सरकारी सूत्रांनी एएफपी वृत्तसंस्थेला सांगितले की, गुरुवारी सकाळी थाई प्रांत सुरिन आणि कंबोडियाच्या ओडर मीन्चे यांच्या सीमेवरील दोन मंदिरांजवळ पुन्हा हिंसाचार झाला. एएपीच्या वृत्तानुसार, थाई सैन्याने दोन कंबोडियन लष्करी तळांवर हवाई हल्ले केल्याची पुष्टी केली आहे.
कंबोडियाकडून झालेल्या जोरदार गोळीबारात किमान दोन थाई नागरिक ठार आणि दोन जण जखमी झाले. ही माहिती थायलंडच्या सुरिन प्रांतातील काबचिएंग जिल्ह्याचे प्रमुख सुत्थिरोट चारोएन्थानासाक यांनी वृत्तसंस्थेला रॉयटर्सला दिली. परिस्थिती बिकट होताना पाहून थायलंडच्या 86 गावांमधील सुमारे 40 हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. सीमेजवळील गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे आणि मदतकार्य वेगाने सुरू आहे.
थायलंडचे कार्यवाहक पंतप्रधान फुमथम वेचायचाई म्हणाले, “परिस्थिती काळजीपूर्वक हाताळली पाहिजे आणि आपण आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार वागले पाहिजे”. ते म्हणाले, “आम्ही आपल्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू.” थायलंडने कंबोडियन राजदूताला हद्दपार केल्यानंतर आणि थाई लष्करी गस्तीतील पाच सदस्य भूसुरुंगात जखमी झाल्यानंतर निषेधार्थ स्वतःच्या राजदूताला परत बोलावल्यानंतर काही तासांतच ही चकमक झाली.
थायलंडचे कार्यवाहक पंतप्रधान वेचायचाई म्हणाले की, कंबोडियाने वादग्रस्त सीमावर्ती भागात नवीन भूसुरुंग बसवले आहेत असे पुरावे थाई सैन्याच्या चौकशीत आढळले. तर कंबोडियाने हा दावा फेटाळून लावला आहे.
सीमेभोवतीच्या अनेक भागांवर दोन्ही देशांनी दावा केला आहे. सीमारेषा स्पष्ट करण्याचे प्रयत्न केले गेले आहेत. मंदिराच्या वादावरून कंबोडियाने 1959 मध्ये थायलंडला आंतरराष्ट्रीय न्यायालयात खेचले होते. 1962 मध्ये न्यायालयाने कंबोडियाच्या बाजूने निकाल दिला आणि म्हटले की प्रेह विहार मंदिर कंबोडियन प्रदेशात येते. थायलंडने त्यावेळी निर्णय स्वीकारला होता परंतु असा युक्तिवादही केला होता की मंदिराभोवतीच्या सीमा अजूनही वादग्रस्त आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List