‘लाडकी बहीण योजने’च्या नावाने गंडा; शेकडो बनावट बँक खाती, प्रत्येक खात्यामागे इतकी कमाई
‘लाडकी बहीण’ योजनेच्या नावाने सर्वसामान्य नागरिकांची बँक खाती तयार करून त्यांचा सायबर गुन्ह्यांसाठी वापर करणाऱ्या टोळीचा छडा पोलिसांनी लावला आहे. याप्रकरणी जुहू पोलिसांनी आतापर्यंत चार जणांना अटक केली आहे. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार प्रतीक पटेल गुजरातमधील असून तो सध्या फरार आहे. लाडकी बहीण योजना महिलांसाठी असली तरी आरोपींनी तयार केलेली बहुतांश बँक खाती पुरुषांची होती. आरोपी प्रतीक पटेलने त्याची काही माणसं या कामासाठी नेमली आणि बनावट बँक खाती उघडली. अविनाश कांबळे हा या प्रकरणातील एक आरोपी असून त्याला जुहू पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या चौकशीतून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
‘लाडकी बहीण’ योजनेसाठी बँकेत खातं उघडावं लागतं. याच गोष्टीची संधी साधत प्रतीक पटेलने त्याची माणसं नेमली. या प्रकरणात अविनाशसह फाल्गुनी जोशी, रितेश जोशी आणि श्रुती राऊत यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत फेब्रुवारी महिन्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी टोळीचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. आरोपी श्रुती राऊतच्या घराची झडती घेतल्यानंतर अनेक बँकांचे पासबुक, बँकांशी संलग्न सिमकार्ड्स पोलिसांना मिळाले. “आम्ही 100 हून अधिक खाती संबंधित बँकेला संपर्क साधून बंद केली आहेत. त्याचप्रमाणे 19.43 लाख रुपयांची रोकड जप्त केली”, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या टोळीचा छडा जरी पोलिसांनी लावला असला तरी या प्रकरणातून योजनेच्या पडताळणी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
प्रत्येक खात्यामागे चार हजार रुपयांची कमाई
25 वर्षांचा आरोपी अविनाश कांबळे हा नेहरूनगर, देवनार, डीएन नगर, धारावी इथल्या परिसरातील झोपडपट्टी परिसरात फिरून ‘लाडकी बहीण’ योजनेच्या नावाखाली लोकांकडून कागदपत्रे घेऊन बँक खाती उघडायचा आणि त्यांना तात्काळ एक हजार रुपये द्यायचा. त्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे येतील असं आश्वासनही तो त्यांना द्यायचा. तात्काळ हजार रुपये मिळत असल्याने लोकांचाही त्याच्यावर विश्वास बसायचा.
अविनाश ही बँक खाती टोळीतील फाल्गुनी जोशी, रितेश जोशी आणि श्रुती राऊत यांना विकायचा. प्रत्येक खात्यामागे त्याला चार हजार रुपये मिळत होते. हे त्रिकुट बँकांचे तपशील गुजरातमधील प्रतीक पटेल याला द्यायचे. याबाबत फेब्रुवारी महिन्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या टोळीची पाळेमुळे खणण्यास सुरुवात केली. जुहू पोलिसांनी अविनाश कांबळे याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने अनेक बँक खाती उघडल्याचं निष्पन्न झालं. बँक खाती उघडताना बँकेने संबंधित ग्राहकाच्या पत्त्याची शहानिशा करणं आवश्यक असते. मात्र बँक ते करत नाही. याचाच फायदा घेत आरोपींनी नागरिकांची कागदपत्रे घेऊन त्यांच्या नावाने शेकडो बँक खाती उघडली, असं जुहू पोलिसांनी सांगितलं.
अडीच हजार बनावट बँक खाती?
आरोपींनी अशा प्रकारे अडीच हजार बँक खाती उघडल्याची शक्यता असून त्यादृष्टीने पोलीस तपास करत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List