‘अजितदादा, शरद पवार, सुप्रिया सुळे एवढाच त्यांचा पक्ष…’ , राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा, चंद्रकांत पाटलांचा खोचक टोला
मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खोचक टोला लगावला आहे.
नेमकं काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे, या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना त्यांनी खोचक टोला लगावला आहे. ‘अशा प्रकारच्या चर्चा पवार कुटुंबाबाबत नेहमीच होतात. पण पुढे जाऊन त्या प्रत्यक्षात येत नाहीत. आताही सारखी चर्चा चालली आहे. अजितदादा, शरद पवार आणि सुप्रिया सुळे एवढाच त्यांचा पक्ष आहे. जयंत पाटील वगैरे हे सर्व जण असे लांब उभे असतात. काय तुम्ही निर्णय घेणार ते सांगा. हे तीन जण मिळून पक्ष होता. रोहित पवार वगैरे हे देखील सर्वजण लांबच आहेत. या तीन जणांच्या एकत्रीकरणाची अशी चर्चा खूप वेळा होते, पण गेल्या अडीच ते तीन वर्षांमध्ये ती काय अजून प्रत्यक्षात आलेली नाहीये,’ असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान ठाकरे बंधू एकत्र येतायेत म्हणून दोन्ही पवारांच्या एकत्रीकरणाची चर्चा सुरू झाली आहे का? असा प्रश्नही यावेळी चंद्रकांत पाटील यांना विचारण्यात आला, यावर उत्तर देणं त्यांनी टाळलं, माहीत नाही असं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान दुसरीकडे शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या गोटात देखील हालचालींना वेग आला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती, त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सचिन आहिर यांनी देखील पवार यांची भेट घेतली आहे. दोन्ही पवार एकत्रीत येणार असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर या भेटींना विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List