सामना अग्रलेख – आता म्हणे तिरंगा यात्रा काढणार, ‘डोनाल्ड’ जत्रा भरवा!
भाजप अनेक उत्सव साजरा करत असतो. आता त्यांनी ‘डोनाल्ड तात्या’च्या नावाने एक कार्निव्हल भरवून त्यात सामील व्हावे. तिरंगा यात्रा कसली काढताय? भारतीय सैन्य पाकिस्तानवर चढाई करायला सज्ज असतानाच डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानच्या मदतीला धावतात व सार्वभौम भारत राष्ट्राला युद्धभूमीतून माघार घ्यायला लावतात. युद्ध पाकिस्तानच्या दहशतवादापासून सुरू झाले आणि अमेरिकेच्या व्यापारापर्यंत येऊन थांबले. टेबलाखाली व्यापाऱ्यांचा सौदा झाला. त्यात सिंदूरही विकले गेले. तिरंग्याचा सौदाच झाला व आता तिरंग्याची यात्रा काढून भाजपवाले लोकांना मूर्ख बनवत आहेत. तिरंगा हाती धरण्याचा नैतिक अधिकार तुम्ही गमावला आहे!
भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे सध्याचे नेतृत्व म्हणजे एक फसलेला तमाशा आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी झाल्याचा उत्सव साजरा करण्याचे त्यांनी ठरवले असून देशभरात तिरंगा यात्रा काढण्याची घोषणा भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी केली. मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा निर्लज्ज प्रकार आहे. पहलगाम हल्ल्याचा बदला पूर्ण झाला नसताना अशा यात्रा काढणे व राजकारण करणे कोणत्याही राजकीय पक्षाला शोभत नाही. मुळात ‘ऑपरेशन सिंदूर’ पूर्ण होण्याआधीच प्रे. डोनाल्ड ट्रम्प यांनी धमकी देऊन भारताला युद्धातून माघार घेण्यास भाग पाडले. पाकिस्तानचा पराभव निश्चित असताना पंतप्रधान मोदी यांनी व्यापाराच्या लोभापायी ट्रम्प यांची धमकी मान्य केली व युद्ध बंद केले. यात ‘सिंदूर’चा बदला कोठे पूर्ण झाला? त्यामुळे एकाच वेळी ‘सिंदूर’ आणि ‘तिरंगा’ यांचा अपमान या लोकांनी केला. तिरंगा यात्रा हे राजकीय थोतांड आहे. भाजप अध्यक्ष डॉ. जे. पी. नड्डा यांनी व त्यांच्या पक्षाने तिरंगा यात्रा काढून विजयाचा जल्लोष करणे म्हणजे सिंदूर गमावलेल्या त्या माता-भगिनींच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. भाजपने याउपर यात्रा काढलीच तर हाती
अमेरिका व ट्रम्प यांचे झेंडे
घ्यावेत व मोदींच्या बरोबरीने ट्रम्प यांचे फोटो बॅनर्सवर छापावेत. पुलवामाचे राजकारण केले तसे आता पहलगाम हल्ल्याचे व 26 भगिनींनी सिंदूर गमावल्याचे राजकारण भाजपने सुरू केले आहे. भाजपची नियत साफ नाही व ते रक्तपिपासू लोक आहेत याचा हा सबळ पुरावा आहे. 13 मे ते 23 मे या काळात ही तिरंगा यात्रा काढली जाईल व त्यात भाजपचे बडे नेते सामील होतील. मोदी वगैरे लोकांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ कसे यशस्वी केले याची माहिती भारतीय जनतेला दिली जाईल. भाजपवाल्यांनी हा जो तमाशा चालवला आहे, तो भयंकर आणि निर्घृण आहे. खरे तर पहलगाम हल्ल्याबद्दल सगळ्यात आधी गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा घेतला पाहिजे. पंतप्रधान मोदींनी सगळ्यात आधी या निष्क्रिय आणि कपटी गृहमंत्र्याला हटवायला हवे होते व त्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’ खरेच यशस्वी झाले काय या आत्मचिंतनासाठी 12 तास केदारनाथच्या गुहेत जाऊन कॅमेऱ्याशिवाय बसायला हवे होते. तिरंगा यात्रा जे काढत आहेत त्यांना या देशाचे पाच प्रश्न आहेत.
– पहलगाम हल्ला भारतीय हद्दीत झाला. मग त्याची जबाबदारी देशाच्या गृहमंत्र्यांनी घ्यायला नको काय? गृहमंत्री अमित शहा यांनी 26 हत्यांबाबतची चूक मान्य केली. त्यामुळे त्यांना बडतर्फ का करू नये?
– पहलगाम हल्ल्यातले ते पाच-सहा दहशतवादी सापडले नाहीत. ते गेले कोठे? भारताने पाकचे 11 सैनिक मारले. त्यापेक्षा हे पहलगामचे अपराधी मारायला नकोत काय? ही जबाबदारी फक्त अमित शहांचीच आहे. ते महाशय सध्या कोठे आहेत?
– पाकिस्तानला भारत अशी जबरदस्त अद्दल घडवणार होता की, पाकिस्तान पुन्हा जमिनीवरून उठणार नाही असे सांगितले गेले. आज पाकिस्तानात युद्ध जिंकल्याचा जल्लोष सुरू आहे तो कशाच्या जोरावर?
– पाकव्याप्त कश्मीरवर कब्जा मिळविण्यासाठी हे युद्ध होते? मग किती इंच ‘पीओके’ भारताने मिळवले?
– अमेरिकेचे प्रे. ट्रम्प यांनी भारत-पाक युद्ध आपण थांबवले असल्याची घोषणा वॉशिंग्टनमधून केली. हे एका सार्वभौम राष्ट्रावरचे आक्रमण आहे. भारताच्या 56 इंचाच्या छातीला ‘पिन’ लावून हवा काढण्याचा हा प्रकार पंतप्रधान मोदींना मान्य आहे काय?
हे पाच प्रश्न महत्त्वाचे आहेत व त्यांची उत्तरे पंतप्रधान
मोदी आणि त्यांचे आंधळे भक्त
देत नाहीत तोपर्यंत तिरंगा हाती घेऊन यात्रा काढण्याचे अधिकार त्यांना नाहीत. भारताने पाकिस्तानला धडा शिकवला नाहीच. उलट डोनाल्ड ट्रम्प यांची गुलामी पत्करली. इंडिया गेटसमोर नेताजी सुभाषचंद्र बोस आणि गुजरातेत सरदार पटेल यांचा पुतळा उभारणाऱ्या या लोकांचे ढोंग साफ उघडे पडले आहे. सोमवारी रात्री देशाला संबोधन वगैरे करताना मोदी यांनी पाकिस्तानला धडा शिकविल्याचे जे प्रवचन झोडले ते निरर्थक आहे. भाजप अनेक उत्सव साजरा करत असतो. आता त्यांनी ‘डोनाल्ड तात्या’च्या नावाने एक कार्निव्हल भरवून त्यात सामील व्हावे. तिरंगा यात्रा कसली काढताय? भारतीय सैन्य पाकिस्तानवर चढाई करायला सज्ज असतानाच डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानच्या मदतीला धावतात व सार्वभौम भारत राष्ट्राला युद्धभूमीतून माघार घ्यायला लावतात. युद्ध पाकिस्तानच्या दहशतवादापासून सुरू झाले आणि अमेरिकेच्या व्यापारापर्यंत येऊन थांबले. टेबलाखाली व्यापाऱ्यांचा सौदा झाला. त्यात सिंदूरही विकले गेले. तिरंग्याचा सौदाच झाला व आता तिरंग्याची यात्रा काढून भाजपवाले लोकांना मूर्ख बनवत आहेत. तिरंगा हाती धरण्याचा नैतिक अधिकार तुम्ही गमावला आहे!
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List