विद्यार्थ्यांसोबतचे गैरकृत्य लपवल्यास शाळेची मान्यता जाणार, शिक्षण विभागाची कठोर नियमावली
शाळेमध्ये विद्यार्थ्यांसोबत घडलेली अनुचित घटना लपवण्याचा प्रयत्न करणाऱया शाळा व्यवस्थापनांची आता खैर नाही. अशा घटनेची माहिती त्यांना चोवीस तासांत शिक्षणाधिकारी आणि पोलिसांना द्यावी लागणार आहे, अन्यथा शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱयांवर कारवाईबरोबरच प्रसंगी शाळेची मान्यता रद्द होणार आहे. शालेय शिक्षण विभागाने त्यासाठी कडक नियमावली बनवली आहे. त्यात स्कूल बस, कॅण्टीन, स्वच्छतागृहांमध्येही विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात आली आहे.
बदलापूर येथील शाळेत विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शालेय शिक्षण विभागाने सर्व शाळांसाठी नियमावली बनवली आहे. त्यात शाळेच्या आवारातच नव्हे तर विद्यार्थ्यांची स्कूल बसमधून ने-आण करतानाही त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापनाची राहणार आहे. त्यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाने पुढीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
– अत्याचाराची तक्रार करण्यासाठी विद्यार्थ्यांना पोक्सो ई-बॉक्स व चिराग अॅपची माहिती द्या.
– विद्यार्थ्यांची उपस्थिती सकाळी, दुपारी आणि शाळा सुटण्याच्या वेळेस नोंदवावी. अनुपस्थित विद्यार्थ्यांची माहिती त्यांच्या पालकांना एसएमएसद्वारे द्यावी. – विद्यार्थ्यांना गुड टच बॅड टच याचे प्रात्यक्षिक द्यावे.
– शाळेपासून एक किलोमीटरच्या परिसरात पान स्टॉल दिसले तर त्याची माहिती पोलिसांना द्यावी.
– शाळांमध्ये तक्रारपेटी बसवावी. ती आठवडय़ातून किमान दोन वेळा उघडून त्या तक्रारींवर कार्यवाही करण्यात यावी. तक्रारदार विद्यार्थ्याचे नाव गुप्त ठेवावे.
– तक्रारपेटीतील तक्रारींवरील कार्यवाहीबाबतचा अहवाल शिक्षण संचालकांनी शासनाला नियमितपणे पाठवावा.
– घर, शाळा आणि समाजात मुलामुलींना सुरक्षित, निरोगी व बालस्नेही वातावरण मिळावे म्हणून सखी सावित्री समित्या स्थापन कराव्यात. या समित्यांनी मुलामुलींची 100 टक्के उपस्थिती राहावी यासाठी काम करावे.
– शाळा व परिसरात सीसीटीव्ही बसवावेत. ते कार्यरत असल्याची खात्री करण्याची जबाबदारी व्यवस्थापनाची असेल. त्याचे पालन न करणाऱया शाळांवर इतर कारवायांबरोबरच मान्यता रद्द करण्याचीही कारवाई केली जाईल.
– कर्मचाऱयांची नेमणूक करण्यापूर्वी त्यांचा चारित्र्य पडताळणी अहवाल पोलिसांकडून घ्यावा. पहिली ते सहावीपर्यंतच्या वर्गांसाठी महिला कर्मचाऱयांची नियुक्ती करावी.
– वाहतूक व्यवस्था, सुरक्षा, उपाहारगृहासाठी नेमण्यात येणारा कर्मचारी वर्ग मान्यताप्राप्त संस्थेकडून घ्यावा.
– शाळांमध्ये व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थी सुरक्षा समिती स्थापन करावी. त्यात पालक, शिक्षक, सखी सावित्री समितीचे प्रत्येकी दोन सदस्य असावेत.
अभ्यागतांसाठीही आचारसंहिता
प्रवेशद्वारांवर अभ्यागतांची येताना आणि जाताना तपशीलवार नोंद ठेवावी आणि ती नियमित तपासली जावी. तपासणीनंतर त्यावर पर्यवेक्षक, समन्वयक, उपमुख्याध्यापक यांनी स्वाक्षरी करावी.
विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत ने-आण करताना त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी शाळांची असणार आहे. त्यासाठी वाहनचालकाची पडताळणी, बसमध्ये जीपीएस यंत्रणा, प्रत्येक बसमध्ये महिला सेवक असेल याची खात्री करावी लागणार आहे. बसचालक, क्लीनर आणि मुलांसोबत असलेल्या महिला सेवकाची आठवडय़ातून एक वेळा मादक पदार्थ आणि मद्य सेवनासंबंधीची चाचणी करावी लागणार आहे.
प्रसाधनगृहांबाबत सूचना
– मुले आणि मुलींसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहे असावीत तसेच मुलींच्या प्रसाधनगृहाबाहेर महिला मदतनीस तैनात करावी. स्वच्छतागृहांमधील वीज, पाण्याची तसेच स्वच्छतेची काळजी घ्यावी. बेल लावली जावी.
– शाळा सुटल्यानंतर वर्गात आणि प्रसाधनगृहामध्ये तसेच शाळेच्या अन्य ठिकाणी विद्यार्थी मागे राहिला नाही याची खात्री पर्यवेक्षकांना करावी लागणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List