मोदींचं नाव घेताच आमिर खानवर भडकले नेटकरी; म्हणाले ‘आता जाग आली का?’
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे चोख प्रत्युत्तर दिलं. 22 एप्रिल रोजी काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. त्यानंतर 7 मे रोजी भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या कारवाईने बिथरलेल्या पाकिस्तानने भारताच्या सीमेजवळील राज्यांमध्ये हवाई हल्ले करण्यास सुरुवात केली. यालाही भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. एकीकडे देशभरात या ‘ऑपरेशन सिंदूर’चं कौतुक होत असतानाच बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी त्यावर मौन बाळगल्याने टीका होत आहे. ऑपरेशन सिंदूरच्या पाच दिवसांनंतर अभिनेता आमिर खानने सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली. यावरून नेटकऱ्यांनी त्याला चांगलंच ट्रोल केलं आहे.
सोशल मीडियावर आमिर खानचं स्वत:चं अधिकृत अकाऊंट नसलं तरी आमिर खान प्रॉडक्शन्स या त्याच्या निर्मिती संस्थेच्या अकाऊंटवरून तो व्यक्त होत असते. ऑपरेशन सिंदूरविषयी त्याने सोमवारी रात्री उशिरा एक पोस्ट लिहिली आहे. ‘ऑपरेशन सिंदूरच्या हिरोंना सलाम. आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी लढणाऱ्या सशस्त्र दलांच्या धैर्य, शौर्य आणि अढळ वचनबद्धतेबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. माननीय पंतप्रधानांच्या नेतृत्त्व आणि दृढनिश्चयाचेही मी आभार मानतो. जय हिंदी’, असं त्याने या पोस्टमध्ये म्हटलंय.
आमिरने जरी या पोस्टमध्ये ऑपरेशन सिंदूरचं कौतुक केलं असलं तरी त्याची वेळ चुकल्याचं नेटकरी म्हणत आहेत. त्याचवरून अनेकांनी त्याच्यावर निशाणा साधला आहे. ‘इतके दिवस शब्द शोधत होतास का’, असा खोचक सवाल एकाने केला. तर ‘आतापर्यंत कुठे गायब होतास? बॉयकॉट करायला सुरुवात केली तर लगेच पोस्ट लिहिली’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘आता झोपेतून उठला वाटतं’, असाही टोला नेटकऱ्यांनी लगावला आहे.
फक्त आमिरच नव्हे तर सलमान खान, शाहरुख खान, अमिताभ बच्चन यांसारख्या मोठ्या कलाकारांनीही ऑपरेशन सिंदूरबद्दल मौन बाळगल्याने चाहते चिडले होते. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली होती. त्याआधी ते सतत ट्विटरवर ब्लँक पोस्ट लिहित होते. खरे हिरो हे चित्रपटांमध्ये काम करणारे नसून सीमेवर लढणार आहेत, असे कमेंट्स करत नेटकऱ्यांनी बॉलिवूड सेलिब्रिटींवर निशाणा साधला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List